। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान हे संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यामुळे इथे मोटार वाहनांना बंदी आहे या प्रदूषण मुक्त गावात बॅटरीवर चालणारी ई रिक्षा हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे आणि त्यासाठी येथील श्रमिक हातरीक्षा संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे हे मागील आठ वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.
काही मूठभर लोकांना ही महत्वाकांक्षी व्यवस्था नकोशी आहे परंतु इथले पर्यटन वाढविण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या भविष्याचा वेध लक्षात घेता पर्यावरण पूरक ई रिक्षा अगदीच सोयीस्कर आणि स्वस्त दरात पर्यटकांना उपलब्ध होऊ शकते. दर पाच वर्षांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत ई रिक्षाच्या विषयाला बगल देऊन मते मिळविली गेली आहेत कारण जे काही मूठभर लोक ह्या व्यवस्थेच्या विरोधात आहेत.
ज्यांनी आजपर्यंत ह्या गावाला विकासापासून रोखून धरले आहे, जी काही मोजकीच मंडळी ह्या गावासाठी शापित बनलेली आहेत अशांना निवडणूक काळात गोंजारले जाते.जग एकविसाव्या शतकात उत्तुंग भरारी घेत असताना मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असलेले हे टुमदार स्थळ आजही केवळ वाहतुकीची व्यवस्था नसल्याने खूपच पिछाडीवर पडले आहे.
समस्त लोकप्रतिनिधी, गावातील विविध मंडळाच्या पदाधिकारी, संस्थेच्या प्रमुखांनी यासाठी सुनील शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून गावाच्या विकासासाठी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ठिकाण विकसनशील बनविण्यासाठी पुढाकार घेऊन शासन दरबारी एकोप्याने पाठपुरावा केल्यास काही अशक्य बाब नाही. ई रिक्षाची ही महत्वपूर्ण सुविधा निर्माण झाल्यास हे सर्व श्रेय स्थानिकांनाच लाभणार आहे.