परीक्षांमुळे पर्यटकांची संख्या रोडावली
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सध्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आता पर्यटक येतात ते फक्त शनिवारी आणि रविवारी. शालेय परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पर्यटन हंगाम सुरू होईल. यावर्षी श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांकडून अनेक वेळा अपघात घडण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती वाढले आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांचा मद्यपी पणा देखील या अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. यावरती पोलीस प्रशासनाने देखील कडक भूमिका घेतली असून, श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या पर्यटकांची फुंकर मारुन मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या शनिवारी देखील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती एका काजू विकणाऱ्या 70 वर्षाच्या आदिवासी महिलेला एका पर्यटकानी धडक दिल्याची घटना घडली होती. श्रीवर्धन पोलिसांनी त्यामुळे जागोजागी बंदोबस्त वाढविला असून, शहरात सुरू असलेली अवजड वाहतूक देखील या ठिकाणी स्थानिक नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. जीवना बंदर व श्रीवर्धन दांडे या ठिकाणी सुरू असलेल्या जेट्टीच्या कामासाठी क्षमतेपेक्षा जास्त दगड भरून ओव्हरलोड वाहतूक श्रीवर्धन शहरातून केली जाते.
