| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या स्पर्धेची सुरूवात ही इंग्लंड आणि न्यूझीलंड या गतविजेत्या आणि उपविजेत्या संघातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून याच मैदानावर विश्वचषकाचा उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा चार ऑक्टोबरला होणार आहे. सर्व सराव सामने हे 3 ऑक्टोबरला संपणार आहेत. त्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये दाखल होतील. हा एक दिमाखदार उद्घाटन सोहळा असणार आहे भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 4 ऑक्टोबरला तिरुवअनंतपुरमवरून अहमदाबादमध्ये सकाळी दाखल होईल. यापूर्वी भारत नेदरलँडविरूद्ध सराव सामना खेळणार आहे.
आयसीसी आणि बीसीसीआयन उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा कशी असले याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. क्रिकबझनुसार हा सोहळा दैदिप्यमान असणार आहे. बॉलिवूडमधील आघाडीचे गायक आणि ख्यातनाम आंतरराष्ट्रीय स्टार्स ही संध्याकाळ यादगार करण्याची शक्यता आहे. सामने हे भारतीय वेळानुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्याच्या आधी उद्घाटन सोहळा आयोजित करणे शक्य होणार नाही. त्यामुळेच उद्घाटन सोहळा हा पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईट शो आणि आतषबाजी सोबतच धमाकेदार नृत्याचं प्रदर्शन देखील होईल. या उद्घाटन सोहळ्याला चाहत्यांसोबतच आयसीसी आणि बीसीसीआयचे सर्व उच्च अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. बीसीसीआय आणि आयसीसी या उद्घाटन सोहळ्याला जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डांच्या उच्च अधिकाऱ्यांना देखील बोलवणार आहे.