| नागोठणे | वार्ताहर |
सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना व निर्देशानुसार सर्वच न्यायालयांतील कारभार आता पेपरलेस होणार आहे. आपल्या जिल्ह्यातही अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात याची नुकतीच सुरुवात झाली. त्यानंतर महाड व पेण येथील कनिष्ठ स्तर न्यायालयातही ई-फाईलिंग कार्यप्रणाली सेवा वकिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ई-फाईलिंग कार्यप्रणाली सेवेचे काम रोहा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.एस. महाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून, रोहा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब देशमुख यांनीही या कामाची नुकतीच पाहणी केली व रोहा न्यायालयातही ही सेवा लवकरच कार्यन्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उच्च न्यायालय व महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन यांच्या सहकार्याने ही ई-फाईलिंग कार्यप्रणाली जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांत सुरु करण्यात येणार आहे. यासाठी सर्व आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. रोहा न्यायालयातही ई-फाईलिंग सेवा व फॅसिलिटी सेंटर लवकरच सुरु होणार असल्याने आता दाखल होणारी नवीन प्रकरणे (खटले) ऑनलाईन पद्धतीने दाखल होणार आहेत. यासाठी ई-फाईलिंग सुविधा केंद्रात संगणक, स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा व इतर उपकरणे बसविण्यात येणार आहेत. या ई-फाईलिंग सुविधा केंद्रात वकिलांच्या मदतीसाठी संगणक परिचालकही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ॲड. नानासाहेब देशमुख यांनी सांगितले.