मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद

‌‘कृषीवल’ने घेतली होती दखल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-चौक राज्यमार्गावर दि प्लेट नावाचे तारांकीत सेवा देणाऱ्या हॉटेलकडे अन्न व औषध प्रशासनचा परवाना, तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाचा ना हरकत दाखला नसल्याचे उघडकीस आले आहे. त्याबद्दल शासनाकडे इमेल द्वारे तक्रार देखील करण्यात आली आहे. त्यासंदर्भात ‌‘कृषीवल’ने आपल्या मुखपष्ठात बातमी देखील प्रसिद्ध केली होती. मात्र, तीन दिवस उलटले तरी अन्न व औषध प्रशासाने या हॉटेलवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही. दरम्यान, ‌‘कृषीवल’ने घेतलेली दखल पाहून हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी हॉटेल बंद ठेवले असल्याच्या चर्चा स्थानिकांमधून होत आहे. तसेच, या हॉटेलवर कारवाई कधी करणार, असा संतप्त प्रश्न देखील प्रशासनला विचारला जात आहे.

कर्जत-चौक या राज्यमार्गाला लागून दि प्लेट हे तारांकीत सेवा देणार हॉटेल आहे. राज्यमार्गावर रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसते. असे असतानाही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या भागाला लागून दि प्लेट हॉटेलचे कुंपण आहे. तसेच, पुढे दीड मीटर अंतरावर बांधकाम केलेले आहे. असे असतानाही राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाने वेगळी सूट दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे हॉटेल व्यवसायात अत्यंत महत्वाचा असलेला अन्न व औषध प्रशासनाचा परवानो दि प्लेट या हॉटेलकडे नाही. तरीदेखील हे हॉटेल गेली दोन वर्षे सुरु आहे. त्यामुळे या हॉटेलकडे अन्न, औषध प्रशासन विभागाचा जाणिवपुर्वक कानाडोळा होत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.

‌‘कृषीवल’ने याबाबत पोलखोल केल्यामुळे जिल्ह्याचे अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी दि प्लेट हॉटेलला भेट दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेलची तक्रार शासनाकडे विजय गायकवाड यांनी इमेलद्वारे केली आहे. दरम्यान, हॉटेल मालकाने दी प्लेट हे हॉटेल ग्राहकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून तसे फलक बाहेर लावण्यात आले आहेत.

Exit mobile version