रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांची घुसखोरी

। पनवेल । वार्ताहर ।
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर सिडकोने बांधलेल्या पॅनल मीटर रूमचा वापर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांकडून केला जात आहे. या मीटर रूमचा ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून सामान आणि राहण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. मात्र रेल्वे अथवा सिडको प्रशासनाकडून त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

हार्बर मार्गावरील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा गराडा असल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकाबाहेरदेखील खाद्य पदार्थ विक्रेते, फळविक्रेते, कटलरी सामानाचे विक्रेते अशा अनेक फेरीवाल्यांचे बस्तान आहे. हे विक्रेते दिवसभर रेल्वे स्थानक परिसरातच व्यवसाय करतात. तसेच विक्रीचे सामान ठेवण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळावर असलेल्या एलटी मीटर रूमचा वापर करतात.

महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे स्थानक परिसरातील या एलटी मीटर रूमची व्यवस्था पाहण्यासाठी सिडको इलेक्ट्रिक विभागाकडून 24 तास कर्मचार्‍याची नियुक्ती केली आहे. तसेच सिडकोकडून सुरक्षा रक्षकदेखील तैनात आहे; मात्र असे असताना फेरीवाले मीटर रूमचा वापर साहित्य तसेच रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी करत असल्याने फेरीवाल्यांच्या घुसखोरीला प्रशासनाचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.

पोलीस निवारा शेडचा वापर
कामोठे- मानसरोवर वसाहतीमधून खांदेश्‍वर रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या मार्गावर पोलीस निवारा शेड बांधण्यात आलेली आहे. शेडवर लावण्यात आलेल्या फलकावर तसा उल्लेख आहे. असे असतानादेखील निवारा शेडचा वापर फेरीवाले करत असल्याने याबाबत आर्श्‍चय व्यक्त होत आहे.

मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर सिडकोने बांधलेल्या मीटर रूमचा वापर फेरीवाल्यांकडून केला जात आहे. याबाबत सिडको तसेच रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे, पण यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने सध्या स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला आहे.

अमोल शितोळे, शहर अध्यक्ष, शेकाप

Exit mobile version