आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
| अलिबाग | प्रतिनिधी |
ठाणे येथे असलेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे रायगडकरांची सतत धावपळ झाली होती. परंतु, या धावपळीला आता ब्रेक लागणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने पासपोर्ट कार्यालय अलिबागमध्ये सुरु होणार असून, शनिवारी 5 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक, विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. मात्र, हे पासपोर्ट काढण्यासाठी रायगडकारांना ठाणे रिजनल पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. पासपोर्टसाठी सतत फेऱ्या माराव्या लागत असल्याने रायगडकरांची प्रचंड धावपळ होते. रायगडकरांच्या या धावपळीला ब्रेक लागण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनासह शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत अलिबागमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत शासनाने त्याला मान्यता दिली आहे. अलिबागमधील जिल्हा डाक कार्यालयाच्या इमारतीलगतच तळमजल्यावर पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यास सुरुवात झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून या कार्यालयाचे काम सुरु होते.अखेर हे काम पूर्ण झाले असून, शनिवारी 5 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.