कोकणच्या विकासाची वाट अरूंदच

ताम्हिणी मार्गावर वाहतुकीचा ताण; अरूंद रस्त्यामुळे निजामपूरकरांची कोंडी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव, निजामपूर ते पुणे जिल्ह्यातील आदरवाडी पर्यंत जाणारा महत्त्वाचा मार्ग आजही अरुंद रस्त्याच्या कोंडीत अडकला आहे. माणगावपासून निजामपूरपर्यंत सुमारे 10 किलोमीटर, निजामपूर ते पुढे ताम्हिणी घाटाच्या दिशेने सुमारे 35 किलोमीटरचा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, खचलेल्या साईड पट्ट्या आणि अपुऱ्या रुंदीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः निजामपूर बाजार पेठेतील अरुंद रस्ता वाहतुकीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे 84 गाव खोऱ्यांची बाजारपेठ असलेल्या निजामपूरचा श्वासच कोंडला आहे.

निजामपूर हे केवळ गाव नसून, परिसरातील 84 गावखोऱ्यांसाठी प्रमुख बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र आहे. याठिकाणी बाजारपेठ, भाजीपाला खरेदी-विक्री, शाळा, महाविद्यालये, आयटीआय, मराठी व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण, उच्च माध्यमिक विद्यालय, महसूल सजा, मंडळ अधिकारी कार्यालय आणि पोलीस दुरक्षेत्र असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे बाजारपेठेतील अरुंद रस्त्यावर पादचारी, दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने आणि औद्योगिक वाहतूक यांचा एकत्रित ताण निर्माण होतो. त्यातच विळे, भागाड औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक ही समस्या अधिक गंभीर करीत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील वाहनांची ये-जा, स्थानिक बाजारपेठेतील गर्दी आणि पुणे, कोकण मार्गावरील पर्यटकांची वाढती संख्या यामुळे निजामपूर परिसरात वाहतूक कोंडीचे प्रसंग वारंवार निर्माण होत आहेत. अरुंद रस्त्यामुळे वाहनांना पुरेशी जागा मिळत नसल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे. दुसरीकडे दिघी बंदराकडून माणगाव मार्गे निजामपूर, विळे, भागाड आणि पुढे ताम्हिणी घाटाच्या दिशेने जाणारा मार्ग औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, दिघी बंदर ते माणगावपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर माणगाव पुढील मार्गाची क्षमता आणि प्रत्यक्ष वाहतुकीतील तफावत अधिक ठळकपणे जाणवू लागली आहे. एका बाजूला मोठ्या क्षमतेचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला अरुंद रस्ता, अशी स्थिती निर्माण झाल्याने वाहतुकीचा ताण निजामपूर आणि परिसरावर येत आहे.

निजामपूर शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र बायपास रस्ता हा आता केवळ मागणीचा विषय न राहता भविष्यातील नियोजनाचा भाग होणे गरजेचे आहे. शहरातील बाजार पेठ, शैक्षणिक संस्था आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी शहरांतर्गत रस्ता आणि बाहेरील औद्योगिक, अवजड व पर्यटक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग अशी दुहेरी व्यवस्था आवश्यक आहे. निजामपूरकरांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि बायपास या दोन्ही मागण्यांवर ठोस निर्णय व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याची मागणी
हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असल्याचे सांगण्यात येते. निधी अभावी रुंदीकरणाची कामे प्रलंबित असल्याने हा मार्ग केंद्राच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यात समाविष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे आली आहे. केंद्राच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास दीर्घकालीन नियोजनातून रस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन शक्य होईल, अशी नागरिकांची भूमिका आहे.
निजामपूर शहराला बायपासची गरज
पर्यटन उद्योगामुळे कोकणच्या विकासाला नवे बळ मिळेल या दृष्टिकोनातून माणगाव, निजामपूर ते पुणे जिल्ह्यातील आदरवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची निर्मिती झाली. मात्र, कोकणच्या विकासाची वाट चार दशकानंतरही अरुंदच राहिली आहे. ताम्हिणी मार्गावर औद्योगिक-पर्यटन वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता रुंदीकरण महत्वाची आहे, तसेच या मार्गसह निजामपूर शहराला बायपासची गरज असून, त्यासाठी पुणे व रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा समन्वय महत्त्वाचा आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय माणगाव-पुणे अरुंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून विकासाची कोंडी सुटेल, असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.
Exit mobile version