मजुरांच्या टंचाईवर यंत्राद्वारे भातलावणीचा पर्याय चौलमळ्यात आधुनिक शेतीचा आदर्श
|चौल | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस शेतीमजुरांची टंचाई वाढत असताना अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील शेतीनिष्ठ शेतकरी रवींद्र गजानन पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत यंत्राच्या साहाय्याने भातलावणी करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कमी वेळ, कमी खर्च आणि अधिक अचूक पद्धतीने भातलावणी होत असल्याने शेतीतील यांत्रिकीकरण हा काळाची गरज असल्याचे या प्रयोगातून अधोरेखित झाले.
रवींद्र पाटील यांच्या शेतावर यंत्राद्वारे भातलावणीचा प्रात्यक्षिक प्रयोग करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे मंडळ अधिकारी मोहन सूर्यवंशी तसेच विनायक थळकर, विराज किर, दिलीप पडते यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भातलावणीची पाहणी केली. या प्रसंगी रवींद्र पाटील यांच्या सौभाग्यवती राधिका पाटील, चिरंजीव सिद्धराज व ऋतुराज, तसेच सून अवंती यांनीही शेतात उतरून भातलावणीचा आनंद घेत आधुनिक शेतीला कुटुंबाचा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.
कृषक कल्याणकारी संस्था, चौलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून रवींद्र पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांत शेतीमध्ये विविध प्रयोग यशस्वीपणे राबवले आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन पिकपद्धती आणि सुधारित शेती व्यवस्थापनाबाबत त्यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांच्या अनुभवाचा लाभही अनेकांना झाला आहे.
भातलावणीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. अशा परिस्थितीत यांत्रिक भातलावणीमुळे वेळेची मोठी बचत होत असून मजुरीवरील खर्च कमी होतो. शिवाय योग्य अंतरावर आणि एकसारखी लागवड होत असल्याने उत्पादनवाढीसही मदत होत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
स्मार्ट शेती, सुंदर शेती
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून चौलमळ्यातील पाटील कुटुंबाने शेती क्षेत्रात एक सकारात्मक संदेश दिला असून, बदलत्या काळात स्मार्ट शेती, समृद्ध शेतकरी या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून बळ मिळत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
कृषी विभागाचे नागाव मंडळ अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले की, शेतीतील यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे. भातलावणीसारखी श्रमप्रधान कामे यंत्राद्वारे केल्यास वेळ, मजुरी आणि खर्च यामध्ये मोठी बचत होते. अशा प्रयोगांमुळे इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीचा आत्मविश्वास मिळेल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी यंत्रांचा वापर करावा.
