टोरंटसाठी हेलिपॅडवर पोलिसांचा पहारा कायम
| नेरळ | प्रतिनिधी |
टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून राज्यभरात पर्यावरणाचा संघर्ष पेटलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्जत दौऱ्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. 3 नोव्हेंबर रोजी सायडोंगर येथील टोरंट जलविद्युत प्रकल्पाचे भूमीपूजन होणार असल्याची चर्चा होती. मात्र, तारीख उलटूनही पंतप्रधान कर्जतमध्ये आले नाहीत. विशेष म्हणजे, नियोजित हेलिपॅडच्या जागेवरील पोलिसांचा रात्रंदिवस पहारा मात्र कायम आहे. आता 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान कर्जत दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, टोरंटच्या भूमीपूजनाचा नवा मुहूर्त नेमका कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी टोरंट प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी कर्जतमध्ये येणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार कर्जत-मुरबाड मार्गावरील पुलाची वाडी परिसरात पंतप्रधानांसाठी तीन स्वतंत्र हेलिपॅड उभारण्याची तयारी करण्यात आली होती. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठीही स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था केली जात होती. मात्र, 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर पाली-सायडोंगर परिसरात प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू झाली आणि संपूर्ण राज्यात पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला. हजारो झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणप्रेमी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत कर्जतमध्ये धाव घेतली. टोरंट प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची धार वाढत असतानाच 3 नोव्हेंबरचा प्रस्तावित पंतप्रधान दौरा झाला नाही.
दरम्यान, आज 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी पुण्ो दौऱ्यावर असतानाही कर्जतच्या टोरंट प्रकल्पाच्या भूमीपूजनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, पुलाची वाडी येथील नियोजित हेलिपॅडच्या ठिकाणी पोलिसांचा जागता पहारा कायम आहे. दुसरीकडे, भूमीपूजनाचा मुख्य सोहळा होण्याची शक्यता असलेल्या लाखाची वाडी येथील शासनाने भाडेतत्त्वावर दिलेल्या 50 एकर जागेवर सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या परिसरातही चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त असून सर्वसामान्यांना प्रवेश नाकारला जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, परिसरातील शेतकऱ्यांनाही स्वतःच्या जमिनीवर शेतीची कामे करण्यासाठी जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याचा आरोप सावळे येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी कर्जतला येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या दौऱ्याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एका बाजूला टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीविरोधात जनक्षोभ वाढत असताना दुसऱ्या बाजूला हेलिपॅड आणि भूमिपूजनस्थळावरील कडेकोट बंदोबस्त कायम असल्याने चर्चांना उधाण आले आहे. 3 नोव्हेंबरचा मुहूर्त हुकला, आता 16 नोव्हेंबरचा वायदा खरा ठरणार का? आणि पर्यावरणाच्या प्रश्नावरून पेटलेल्या कर्जतमध्ये पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी पुन्हा सुरू होणार का, याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.
आता 16 नोव्हेंबरचा वायदा?
टोरंट जलविद्युत प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 नोव्हेंबर रोजी कर्जत दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांकडून सुरू आहे. पुलाची वाडी येथील नियोजित हेलिपॅड आणि लाखाची वाडी येथील 50 एकर जागेवर पोलिसांचा रात्रंदिवस पहारा कायम आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
