। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातील जुन्या कुंभारआळीत जांभळाच्या झाडामध्ये विद्युतवाहिनी गुरफटलेली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. या ठिकाणी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. तसेच, हे झाड रस्त्यालगतच असून येथून स्थानिकांसह जनावरांचा देखील मुक्त वावर असतो. त्यामुळे दुर्घटना झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. या बाबतचे वृत्त कृषीवलने प्रसिद्ध केले होते. त्याची तात्काळ दखल घेत जांभुळपाडा येथील महावितरण सहाय्यक अभियंता मंगेश राजगे यांनी धोकादायक विद्युतवाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश कर्मचार्यांना दिले. त्यांच्या आदेशानुसार महावितरणच्या कर्मचार्यांनी वृक्षछाटणी केली आणि झाडातून विद्यूतवाहीनी मोकळी केली.