अलिबाग तालुक्याचा विजपुरवठा खंडीत; आरसीएफच्या प्लांटला फटका

साडेपाच तास खंडीत विजपुरवठयाने यंत्रणा ठप्प

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आपटावरुन येणारी इएचव्ही लाईन (अतिरिक्त उच्च दाब) ट्रीप झाल्याने अलिबाग तालुक्याला विजपुरवठा करणार्‍या थळ इएचव्ही सबस्टेशनचा विजपुरवठा तब्बल सहा तास खंडीत झाला होता. त्यामुळे अनेक यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. याचा फटका राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्सला (आरसीएफ) देखील बसल्याने काही प्लांट बंद पडल्याने मोठे नुकसान सोसावे लागले. तालुक्यातील तब्बल 47 हजार ग्राहकांना याचा फटका बसला.

अलिबाग तालुक्याला महापारेषणच्या विजपुरवठा करणार्‍या आपटा रेल्वे क्रॉसींग येथील इएचव्ही लाईनचा कंडक्टर दुपारी एकच्या सुमाराच अचानक ट्रीप झाल्याने थळ इएचव्ही सबस्टेशनचा विजपुरवठा खंडीत झाला होता. 22 किलावॅट चे चार इनकमर प्रभावित झाले होते. तब्बल साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर महापारेषणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे जिवपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मात्र याच मोठा फटका थळ येथील आरसीएफच्या कारखान्याला बसला. कारखान्यातील तीन युरिया प्लांट, आणि ऑर्गन प्लांट काही काळासाठी बंद पडले होते. त्यानंतर आरसीएफच्या अंतर्गत विजपुरवठयावर सदर प्लांट पुन्हा सुरु करण्यात आले. तर पुर्णपणे विजपुरवठयावर अवलंबून असलेला अमोनिया विस्तारित संयत्र (हेवी वॉटर प्लांट) पुर्णपणे साडेपाच तास बंद पडला होता. यामुळे आरसीएफचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

तसेच अलिबाग तालुक्यातील तब्बल 47 हजार ग्राहकांचा तसेच सर्व शासकीय कार्यालये, लघुउद्योजक यांचा विजपुरवठा खंडीत झाल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. तब्बल साडेपाच तासांनी महापारेषणच्या कर्मचार्‍यांनी प्रयत्नकरीत विजपुरवठा पुर्ववत केला.

Exit mobile version