| मुंबई | प्रतिनिधी |
महानगर गॅस लिमिटेडने राज्यातील सीएनजीच्या किमतींमध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात सीएनजीच्या किमती दोन रुपये प्रतिकिलोने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत.
मुंबईत आधी सीएनजीची किंमत 75 रुपये प्रतिकिलो होती. त्यानंतर आता यात दोन रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी 77 रुपये प्रतिकिलोवर विकले जाणार आहे. सीएनजीच्या किमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षाचालकांवर याचा परिणाम होणार आहे. याचा प्रवाशांनाही फटका बसू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, एमजीएलने उत्पादन दरात वाढ झाल्याने सध्याची दरवाढ केल्याची माहिती दिली. नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या सर्व कारणांमुळे एमजीएलने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमजीएलने याआधीच म्हणजे जुलै 2024 मध्ये सीएनजीची दरात वाढ केली होती.