। पेण । प्रतिनिधी ।
या देशात सर्व नागरिकांना एकच संविधान असून यामधील अधिकार देखील सर्वांना समान आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र मानवी हक्क आयोग सचिव नितीन पाटील यांनी केले आहे. ते अंकुश ट्रस्ट व लोकमंच या संघटनेने आयोजित केलेल्या हुतात्म्या नाग्या महादू कातकरीच्या स्मृतिदिन निमित्त पेण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. सन 1997 मध्ये हुतात्म्या नाग्या महादू कातकरी यांचे नाव चिरनेरच्या मूळ स्तंभावर यावे म्हणून अंकुर ट्रस्ट मार्फत सर्वप्रथम चळवळ उभारण्यात आली होती. कातकरी आदिवासींच्या प्रयत्नांमुळे आता चिरनेरच्या स्तंभावर या हुतात्म्याचे नाव कोरले असून आता पुतळाही उभारण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला टाटा स्टीलचे प्रकल्प समन्वयक भावेश रावल उपस्थित होते. यावेळी आदिवासींमध्ये कार्य करणार्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील आलेल्या शिथिलतेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, जंगलचा राजा हक्क न मिळाल्यामुळे स्थलांतरित कामगार होत आहे, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावेळी आदिवासी कार्यकर्ते संजय नाईक, ग्रामपंचायत सदस्य अंजली वाघमारे, विद्यार्थिनी निकिता वाघ, वंदना वाघमारे यांनी आपल्या प्रश्नांची मांडणी केली असता मानवी हक्क आयोगामार्फत त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली. तसेच, आदिवासींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून आपल्या हुतात्म्याचा दिवस साजरा करण्यात आला.