गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना राहिला आहे. त्यामुळे अलिबासह पेण व इतर कला केंद्रांत मूर्तींचे रंगकाम वेगाने सुरु झाले आहे. स्थानिक कामगारांच्या मदतीने हे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना गणेश मूर्ती वेळेवर देण्यासाठी रंग कामाची लगबग वाढली आहे.

कोकणासह रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. यावेळी दीड दिवसांपासून ते दहा दिवसांसाठी एक लाखाहून अधिक गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत. गणेश कला केद्रांमध्ये शाडू मातीसह पीओपीच्या गणेशमुर्ती तयार करण्यात आल्या आहेत. हाताळण्यास सोप्या व वजनाने हलक्या असलेल्या पीओपी मूर्तीला अधिक मागणी असल्याचे ग्राहकांनी सांगितले. ग्राहकांच्या मागणी व पसंतीनुसार मुर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यंदा टीटवाळा येथील गणेशमुर्तीला अधिक पसंती दर्शविली आहे. आता या मुर्तींना रंग देण्याचे काम सुरु झाले आहे. बाप्पाचे आगमन होण्यासाठी अवघे 31 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे रंगकाम करण्याचा वेगही वाढला आहे. यावेळी सकाळ व रात्र पाळी या दोन टप्प्यात हे काम केले जात आहे. रंगकाम करण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कला केंद्रात कामगार म्हणून लाभले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवस तरी त्यांना पाचशे ते सहाशे रुपयांच्या रोजंदारीवर हाताला काम मिळाले आहे. यंदा जून ते जूलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गणेशमूर्त्यांचे नुकसान झाल्यामुळे मूर्तींच्या किंमतीमध्ये 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. 2 फुटापासून 10 फुटापर्यंतच्या मुर्तींच्या किंमतीमध्ये 500 रुपयांपासून 13 हजार रुपयांपर्यंत किंमत वाढली असल्याचे मुर्तीकारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना मुर्तीमागे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

मुर्तींच्या किंमतीव दृष्टीक्षेप

मुर्तींची उंचीपुर्वीचे दरआताचे दर
2 फुट2,500 रु3,000 रु.
3 फुट3,000 रु. 5,000 रु.
6 फुट15,000 रु.25,000 रु.
10 फुट32,000 रु.45,000 रु.

गणेशमुर्तींना रंग देण्याचे काम वेगात सुरू आहे. स्थानिक कामगार हे काम करीत आहेत. अतिवृष्टीचा गणेश कला केंद्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. यंदा टिटवाळा गणेशमुर्तीला अधिक मागणी आहे. तसेच, सर्वात जास्त पीओपीच्या मुर्तींना ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली आहे.

रणजीत तुणतूणे,
आयुष कला केंद्र, सहाणगोठी
Exit mobile version