बसस्थानकाची संरक्षक भिंत कोसळली

। तळा । वार्ताहर ।

तळा बसस्थानकाची संरक्षक भिंत एस.टी.च्या धडकेत कोसळली. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसस्थानकात एस.टी. पार्क करताना बर्‍याचदा एस.टी.ची मागील बाजू धडकत असल्याने दिवसेंदिवस भिंत कमकुवत होत चालली होती.

याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे अनेकदा ही बाब एस.टी. महामंडळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. अशातच बुधवारी चालक तळा ते इंदापूर जाणारी एस.टी. पार्क करत असताना मागील बाजूची धडक बसल्याने ही संरक्षक भिंत कोसळली.

या ठिकाणी नेहमी मच्छीविक्रेत्या महिला गटागटाने बसलेल्या असतात. परंतु बुधवारी गणेश चतुर्थीमुळे त्याठिकाणी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेनंतर तरी एस.टी. प्रशासनाला जाग येईल का की पुन्हा नागरिकांच्या जीवाशी खेळले जाईल असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version