अपुर्‍या कर्मचार्‍यांचा प्रश्‍न ऐरणीवर

महसूलच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह
| रोहा | प्रतिनिधी |

रोहा पंचायत समितीच्या स्व. द.ग. तटकरे सभागृहात झालेल्या या सभेत उपस्थितीत सर्व विभागांकडून त्यांच्याकडे असलेला अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्गाचा प्रश्‍न ऐरणीवर आला. यासोबतच तालुक्यातील महत्त्वाचा विभाग असलेल्या महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर सदस्य राकेश शिंदे यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत सर्वसामान्य शेतकरी नागरिकांना शासकीय नियमानुसार सेवा देण्याची सूचना यावेळी त्यांनी सभेकडे केली. या सभेस रोहा तहसीलदार तथा समिती सचिव कविता जाधव, सदस्य शंकरराव म्हसकर, उद्देश वाडकर, हरिश्‍चंद्र वाजंत्री, बाबूराव बामणे, महेंद्र हंबीर, अंजली कुंडे, भाग्यश्री भगत यांसह 18 विविध विभागांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विजयराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापीत झालेल्या रोहा तालुका समन्वय समितीची पहिलीच सभा शुक्रवार, 29 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती.
महसूल, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, उत्पादन शुल्क, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, प्रकल्प अधिकारी, वन, सामाजिक वनिकरण, आरोग्य, राज्य परिवहन आगार, औद्योगिक महामंडळ आदी विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित सर्व विभागांचे प्रतिनिधींनी आपापल्या विभागांतर्गत करण्यात येणार्‍या कामांची व योजनांची माहिती सभेस दिली. आपल्या विभागाची संरचना विशद करताना प्रत्येक विभागाकडून अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. तहसीलदार कविता जाधव यांनी सभेचे प्रास्ताविक करताना आज पहिलीच सभा असल्यामुळे सर्व विभागांची सदस्यांना माहिती व्हावी व यापुढे आजच्या सभेत अध्यक्ष व सदस्य यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावेत, अशा सूचना दिल्या.

सभेचे अध्यक्ष विजयराव मोरे यांनी सभेस संबोधताना लवकरच येणार्‍या पावसाळ्याच्या दृष्टीने कृषी, वीजवितरण, आरोग्य या विभागानी पुढील बैठकीमध्ये त्यादृष्टीने करण्यात येणार्‍या उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या. तालुक्यातील बहुतांशी सर्वच विभागातील अपुरा कर्मचारी वर्ग हा प्रश्‍न शासनाच्या निदर्शानास आणून रिक्त असलेली पदे भरण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत अधिकाधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रस्ताव या सभेद्वारे शासनाकडे करणार असे त्यांनी शेवटी सांगितले.

Exit mobile version