एका गाडीच्या थांब्यासाठी करोडोंचा खर्च
| कोलाड | वार्ताहर |
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रायगड जिल्ह्यातील कोलाड व विर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन 6 सप्टेंबर 2024 रोजी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, याच कोलाड स्थानकात फक्त एकच पॅसेंजर गाडी थांबत असल्यामुळे हे सुशोभिकरण काय कामाचे? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, वीर, कोलाड ते पनवेलपर्यंत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी देखील जोर धरत आहे.
कोकणात रेल्वे सुरु करण्यासाठी 1977 साली मधु दंडवते हे रेल्वे मंत्री असतांना कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी ई. श्रीधरण यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या महामार्गाचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर 1989 ते 1990मध्ये रेल्वे मंत्री जॉज फर्नांडीस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला चालना दिली. कोकणचा विकास व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या जमिनी कोकण रेल्वेसाठी दिल्या. कोकण रेल्वे पहिल्यांदा रोहा ते वीर स्थानकादरम्यान धावली होती. गतवर्षी या स्थानकादरम्यान असलेल्या कोलाड आणि वीर स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु, सध्या याच मार्गावरील कोलाड स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत. फक्त दादर-रत्नागिरी एकच पॅसेंजर गाडी थांबत असून, दुसरी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी ही कोरोना काळापासून बंद करण्यात आली आहे. ती अद्याप ही सुरु न झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे हाल होतांना दिसत आहे.
कोलाड हे व्हाईट वॉटर राप्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण असुन बाजूला कुंडलिका नदी, हिरवेगार निसर्ग, धबधबे सह्याद्रीची नयनरम्य पार्श्वभूमी यासाठी ओळखले जाते. कोलाडसह परिसरातील गोवे येथे असणारे श्रीमती गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल असल्यामुळे येथे महाराष्ट्राच्या कान्हाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. त्याच कॉलेजच्या बाजुने कोकण रेल्वे गेली आहे. परंतु, येथे कोणतीही लोकल सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोलाड परिसरात वाड्या व वस्त्या धरून एकूण 71 गावांचा समावेश आहे. येथून मुंबई जवळ असल्यामुळे पनवेल-कोलाड ते वीरपर्यंत लोकल सेवा सुरु झाली तर उद्योगधंद्याना चालना मिळेल. तसेच, गृहिणींसह विद्यार्थ्यांना पार्ट टाईम नोकरी करता येईल. त्याचबरोबर कोलाडपासून पुणे हे नजिकचे ठिकाण असुन पुणे मार्गाकडे जाणाऱ्या लोकांचा ही फायदा होईल. या सर्व बाबींचा विचार करता कोलाडसह परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल व तरूणांना देखील रोजागराची चालना मिळेल. त्यामुळे दिवसातून कमीत कमी तीन वेळा पनवेल-कोलाड ते वीरपर्यंत लोकल रेल्वे सुरु करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.