चौपदरीकरणाच्या कामांमुळे रस्त्याची दुरवस्था
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईला जाण्यासाठी रायगडला जोडणाऱ्या घाटांची परिस्थिती मागील काही वर्षांपासून धोकादायक बनली आहे. दुरवस्थेमुळे हे घाट मृत्यूमार्ग बनले आहेत. आंबा घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट, अणुस्कुरा घाटात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे आंबा घाट अर्धाअधिक खणून ठेवण्यात आल्याने नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने या घाटाची स्थिती दयनीय झाली आहे. पावसात माती येऊन रस्त्यात चिखल साचतो. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असते.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा कुंभार्ली हा एक महत्वाचा घाटमार्ग आहे. चिपळूणमार्गे पाटण कराडला पुणे-बंगळूर हायवेला जोडला गेला आहे. सुमारे 23 कि.मी.चा हा घाट रस्ता आहे. मागील तीन वर्षात 10 कोटींहून अधिक खर्च संरक्षक भिंती उभारण्यावर झाला आहे. मात्र, याची कामेही काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. जुन्या भिंती काढून नवीन संरक्षक भिंती टाकण्यात आल्या आहेत. ही कामेही अर्धवट स्थितीत आहेत. नव्या जागी संरक्षक भिंती उभारण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या पावसात उंच कड्यातून दरडी कोसळण्याचा धोका असतो.
अणुस्कुरा घाटाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
आंबा घाटाला पर्याय म्हणून अणुस्कुरा घाटाकडे पाहिले जाते. राजापूरमधून पाचलमार्गे मलकापूरपर्यंत रस्ता जातो. 10 ते 12 कि.मी.चा हा घाट मार्ग आहे. घाटात उभ्या कड्यातून माती किंवा दरडी अधूनमधून कोसळण्याच्या घटना घडतात. याठिकाणी संरक्षक भिंतींची कामे झाली आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंतींची आवश्यकता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या घाटाकडे दुर्लक्ष होत आहे.
आंबा घाटात रस्त्यावर चिखल
रत्नागिरी-कोल्हापूरला जोडणारा हा महत्त्वाचा घाट आहे. जवळपास 16 कि. मी. च्या घाटात चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डोंगर कापण्यात आल्यामुळे मातीचा भाग पावसात कोसळण्याची शक्यता आहे. गतवर्षी पावसात मातीचा भराव रस्त्यावर येत होता. यावर्षी पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखल साचला.