गेल्या 40 वर्षांतील दुर्मिळ घटना
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून अक्षरशः ‘समुद्री खजिना’ सापडला आहे. हा खजिना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, मोठ्या प्रमाणावर सापडलेली शिंपले (स्थानिक भाषेत मुळे). गेल्या 40 वर्षांत अशी घटना घडली नसल्याने, भाट्ये किनाऱ्यावर मुळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका मच्छिमाराच्या पायाला हे घबाड लागल्याने ही बातमी समोर आली. कोकणात या शिंपल्यांना मुळे किंवा शिंपले म्हणतात. प्रामुख्याने तसरे आणि धामणे अशा दोन जाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. कोकणातील मत्स्यप्रेमी खवय्ये तसरे मुळे मोठ्या आवडीने खातात आणि त्यांना मोठी पसंती असते. मात्र, सध्या भाट्ये किनाऱ्यावर सापडत असलेली मुळ्यांची जात थोडी वेगळी आहे. याला चायना मुळा असे स्थानिक नाव देण्यात आले आहे. या चायना मुळ्यांचे घबाड भाट्ये किनाऱ्यावर सापडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या उत्साहात हे मुळे गोळा करत आहेत. ही दुर्मिळ घटना अनुभवण्यासाठी आणि या अनोख्या समुद्री खजिन्याचा लाभ घेण्यासाठी अजूनही किनाऱ्यावर लोकांची वर्दळ सुरू आहे.