सह्याद्री प्रतिष्ठान कर्जतचा प्रयत्न; गडावरील पुरातन वस्तूंना नवी झळाळी
| नेरळ | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले कोथळीगड तथा पेठ किल्ला येथे सह्याद्री प्रतिष्ठानकडून श्रमदान करण्यात आले. पावसाळा सुरू होत असताना लोखंडाच्या स्वरूपातील शिवकालीन वस्तूंना गंज लागू नये, यासाठी त्यांना रंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे किल्ल्यावरील पुरातन वस्तूंना आता नवीन झळाळी मिळाली आहे.
कर्जतजवळील आंबिवली गावानजीक असलेला कोथळीगड हा पेठचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. त्याचे कारण त्याच्या पायथ्याशी पेठ गाव वसलेले आहे. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या या किल्ल्याची निर्मिती स्वराज्यातील महत्व ओळखून केली होती. स्वराज्यात या किल्ल्याचा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी विशेष वापर केला जात होता. मात्र, त्याच काळात फितुरीमुळे गडाची अंमलबजावणी मुघलांच्या हातात गेली होती. त्यानंतर अडगळीत पडलेल्या या किल्ल्याची दुरवस्था झाली होती.
कोथळीगड नेहमीच ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा विषय ठरत असतो. त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षे सह्याद्री प्रतिष्ठानाकडून कार्य केले जात असून स्थानिक दुर्गसेवकांचा देखील त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला आहे. दरम्यान, सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाच्यावतीने पावसामुळे किल्ले कोथळीगडावरील पुरातन वस्तूंचे नुकसान होऊ नये म्हणून किल्ल्याची शाकारणी मोहीम राबविण्यात आली. या गडस्वच्छता मोहिमेत कर्जत कोथळीगडावरील तोफगाडे व महादरवाजाची स्वच्छता करून त्यांना वॉर्निश रंगकाम करण्यात आले. भविष्यात गडावर सौरऊर्जा आधारित पथदिवे, अपघातप्रवण भागात रेलिंग, तसेच तोफगाड्यांसाठी छप्पर लावण्याचा मानस प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचा आहे. दरवर्षी पावसामुळे दरड कोसळलेल्या ठिकाणी लवकरच दिशादर्शक फलकही लावण्यात येणार आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे.