| चिरनेर | प्रतिनिधी |
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती व उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तासन तास वाट पहावी लागत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होत आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चार वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, हे वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णाला तालुक्याच्या रुग्णालयात नेण्याची वेळ आली. या आरोग्य केंद्रात गरीब व गरजू रुग्णांबरोबर दुर्गम वाडी-वस्तीवरील आदिवासी उपचारासाठी येत असतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेळेवर उपस्थिती नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते जीवन गावंड हे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, मध्यंतरी हे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र इटकरे,
तालुका आरोग्य अधिकारी उरण