| तळा | प्रतिनिधी |
तळा नगरपंचायत हद्दीत तहसील रस्त्यावरील धरणाच्या बाजूला नव्याने मंजूर झालेल्या शासकीय विश्रामगृहाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. हे सुरू केलेले काम अंत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, या कामाची गुणवत्ता तपासून चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश वडके यांनी माणगाव सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता गणगणे यांच्याकडे केली आहे.
राकेश वडके यांनी 2 जून रोजी गणगणे यांची भेट घेऊन कामाची वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि याबाबतचे त्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळा येथे विश्रामगृह बांधण्यासाठी राज्य सरकारने 3 कोटी 14 लाख 54 हजारांचा निधी मंजूर केला आहे. या मंजूर कामाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली असून, त्याची पाहणी केली असता नेमलेल्या ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित कामावर लक्ष ठेवणारे अभियंते या ठिकाणी फिरकत देखील नसल्याने ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृहाच्या कामाची त्रयस्थ एजन्सी मार्फत गुणवत्ता तपासणी करावी, संबंधित कामावर लक्ष ठेवणारे अभियंते व निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना कळ्या यादीत टाकावे. त्याचप्रमाणे संबंधित कामासाठी वितरीत होणारा शासकीय निधी त्वरित थांबवावा, अशी मागणी राकेश वडके यांनी निवेदनात केली आहे.