नेरळमधील भाताचे गोडाऊन फुल्ल

भात खरेदी केंद्रावर पोत्यांचे ढीग
कळंब गोडाऊन अजूनही भरलेलेच

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील भाताची शेती करणारे शेतकरी यांनी पिकवलेला भात शासनाच्या आधारभूत किमतीने खरेदी केले जाते. कर्जत आणि नेरळ येथे शेतकर्‍यांचा भात मोठ्या प्रमाणात पोहचले असून, त्यामुले शासनाची गोडाऊन पूर्ण भरले आहेत. त्यामुळे कर्जत आणि नेरळ येथे शासनाने नवीन गोडाऊन बांधावे तसेच कळंब येथील भाताच्या पोत्यांनी भरलेले गोडाऊन रिकामे करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


शासनाच्या मार्केटिंग फेडरेशन च्या माध्यमातून भाताची आधारभूत किमतीने खरेदी केली जाते. शेतकर्‍यांकडून भाताची खरेदी कर्जत तालुक्यात कर्जत, कडाव आणि नेरळ येथील शासनाने नियुक्त केलेल्या संस्थांकडून केली जात आहे. मात्र कर्जत येथील खरेदी विक्री संघ आणि नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्याकडून भाताची हमी भावाने खरेदी उपक्रमास शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कर्जत येथील दोन्ही शासनाची गोदामे भाताच्या पोत्यांनी भरून गेली आहेत. तर, नेरळ येथील एकमेव गोदामदेखील भाताने भरून गेले आहे. त्यामुळे भाताच्या पोटी गोदामाच्या बाहेर ठेवली जात आहेत. बदललले हवामान यामुळे पाऊस कधीही येण्याची शक्यता असते. त्यामुळे गोडाऊन बाहेर ठेवलेली भाताची पोटी यावेळी येणार्‍या पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे.त्यामुळे शासनाने गोळा झालेला भात येथून उचलून न्यावा आणि संभाव्य धोका टाळावा अशी सूचना शेतकरी करीत आहेत.

नवीन गोदाम बांधा
शासनाने भाताची गोदामे कमी पडत असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन भाताची साठवण करण्यासाठी नव्याने गोदामे बांधावी, अशी मागणी नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी आणि कर्जत खरेदी विक्री संघाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. नेरळ सोसायटी कडे तर एकच गोदाम सध्या उपलब्ध आहे, त्यामुळे कळंब येथे असलेले शासकीय गोदाम खुले करण्याची मागणी केली आहे. कळंब येथील गोदामात गेल्या वर्षी खरेदी करण्यात आणलेले भात अजूनही पडून आहे. ते उचलल्यास साधारण 2500 क्विंटल भाताची साठवण तेथे होऊ शकते आणि त्यामुले भाताची खरेदी देखील होऊ शकते, अशी माहिती शेतकरी देत आहेत.

Exit mobile version