नेरळ ग्रामपंचायतची केवळ बॅनरबाजी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना शाखेच्या समोरील रस्ता काँक्रिटीकरण करताना बंद करण्यात आला. त्यानंतर अनेक ग्रामस्थांनी हा रस्ता पुन्हा सुरु करावा यासाठी नेरळ मागणी सातत्याने केली जात आहे. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायतीकडून या भागात फलक लावून रस्ता खुला करण्यास आणि वाहने रस्त्यावर न लावण्यास कोणाची हरकत असेल तर तक्रारी करण्याची जाहीर आवाहन केले होते. मात्र, कोणीही हा रस्ता खुला करण्यास विरोध केला नाही आणि असे असतानादेखील नेरळ ग्रामपंचायतीकडून रस्ता खुला करण्यात आलेला नाही.
नेरळ बाजारपेठमधील रस्त्यांची काँक्रिटीकरण यांची कामे 2017 पासून सुरु झाली. मात्र, त्या काँक्रिटीकरण कामामध्ये नेरळ बाजारपेठपासून शिवसेना शाखेसमोर जाणार्या रस्त्यावर फुटपाथ बांधण्यात आला आणि तेथून रिक्षाची वाहतूक होणारा रस्ता बंद झाला.सागर इलेक्ट्रिक व खडे हॉटेलच्या मध्य भागातून जुना काँक्रिटी रहदारीचा रस्ता होता यामध्ये गटारावरील पायर्या काढून येथे दोन चाकी गाड्या पादचार्यांना येण्या-जाण्याच्या मार्गासाठी रस्ता करण्याबाबत स्थानिक नागरिक व व्यापारी ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी करत आहेत. नेरळ ग्रामपंचायत यांच्याकडून जाहीर आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते, परंतु त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय यांच्या बाजूस भात गिरण असल्याने तेथे शेतकरी आपले धान्य घेऊन ट्रॅक्टर किंवा टेम्पोने येत असतात. परंतु, कार्यालयासमोर दुकानाचे गाळे असल्याने तिथे खरेदीसाठी लोक आपली गाडी लावत असतात तसेच गाळेमालकदेखील आपल्या दोन-तीन गाड्या दुकानासमोर लावत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे तेथून बाजारपेठेमध्ये येण्या-जाण्यासाठी पायी रस्तादेखील अवघड होऊन गेला आहे.
या सर्व गोष्टीकडे ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासकाचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर आहे की नाही, असा प्रश्नदेखील इथे उपस्थित होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
दोन्ही रस्त्यांवर दुचाकी लावण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत नेरळ पोलीस यांना पत्र दिले जाईल. जेणेकरून हे दोन्ही रस्ते कायमस्वरूपी वाहनांसाठी खुले ठेवण्याचा ग्रामपंचायत यांचा प्रयत्न राहणार आहे.
– अरुण कार्ले, ग्रामपंचायत अधिकारी