खुजारे ग्रामस्थ आक्रमक; काम बंद करण्याच्या पवित्र्यात
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव, मेघरे, खुजारे याठिकाणी बॉक्साईट विपुल प्रमाणात आहे. खाणीतून बॉक्साईटच्या उत्खननासाठी परवाना घेण्यापासून ते कारखान्यात पोहोचवण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर नियमांना हरताळ फासला आहे. त्यामुळे पर्यटनसाठी प्रसिद्ध असणार्या तालुक्यातील गावांमधून बेसुमार उत्खननाला विरोध करण्यात येत आहे.
आर्थिक उलाढालीतून खाणमालक मालामाल होत असल्याचे चित्र आहे. मालकांबरोबरच स्थानिक चारचौघा धनदांडग्यांची तुंबडी भरली जात असल्याचा आरोप सर्वसामान्य शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. उत्खननामुळे पर्यावरणीय र्हास प्रचंड प्रमाणात होत आहे. त्याचे परिणाम आगामी काही वर्षांतच आपल्याला भोगावे लागणार असल्याने सुरुवातीला कुरवडे आणि आता खुजारे ग्रामस्थ बॉक्साईट खाणीविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
खाणीचे उत्खनन नियम, परवानगी घेईपर्यंत कागदावर व्यवस्थित असतात. परवाना मिळाला की हवे तसे उत्खनन केले जाते. उत्खनन करताना काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक विशिष्ट चौकोन काढून त्यातील उत्खनन आधी करावे, त्यानंतर तो खड्डा बुजवण्यासाठी शेजारील चौकोनात उत्खनन करावे, असे सूचना सांगते; परंतु प्रत्यक्ष खाणींची स्थिती पाहिली तर सर्रास आपल्या मनाला येईल तसे उत्खनन करून मोठे खड्डे करून कधीही भरून न येणारे नुकसान केले जात आहे. तसेच उत्खनन किती झाले याची मोजदाद करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचाही फायदा खाणमालक घेत आहेत. त्यामुळे बॉक्साईट उत्खनाला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येत आहे.
गावातील चारचौघांच्या दलालीमुळे गावाच नुकसान होत आहे. धुळीमुळे उत्पन्न देणारे काजू, आंबा झाडे उद्ध्वस्त होत आहेत. याशिवाय प्रशासनाकडून कोणतीच माहिती न देता कायद्यांना बगल देऊन मोठ्या प्रमाणावर जमीन मालकांची फसवणूक होऊन गैरव्यवहार केला जात आहे.
निलेश खेडेकर,
रहिवासी
बॉक्साईट मालाचे उत्खनन करताना सुरुंग स्फोट केल्याने गावातील जिवंत पाण्याचे स्त्रोत्र बंद झाले आहेत. याहून अधिक घटना येथील ऐतिहासिक मदगड किल्ल्याचे बुरूजदेखील कोसळले. आता नव्याने बॉक्साईट खाणी सुरू झाल्या आहेत. मात्र, शासनानेच दुर्लक्ष आमच्या व जैवविविधतेच्या जीवावर आले आहे.
बाळकृष्ण गायकर,
ग्रामस्थ
बॉक्साईट खाणीसाठी अंदाजे पूर्वीच परवानगी काढण्यात आल्या आहेत. त्यावेळचे खाणीकाम सुरू असून, या कामासाठी राज्य शासनाकडून परवाना देण्यात येतो.
महेंद्र वाकलेकर,
तहसीलदार श्रीवर्धन
मालकी जागेत कंपनीची दादागिरी
खुजारे गावातील शेतकर्यांच्या बागायत जमिनीतून बॉक्साईट खानकंपनीकडून रस्ते करण्यात आले आहेत. यासाठी वृक्षांची तोड, घरादारावर धुळीचे संकट असून, हे थांबवण्यासाठी खुजारे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे.