। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील आषणे गावातील रस्त्याची पावसाच्या पाण्याने दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास संपूर्ण रस्ता वाहून जाण्याची भीती असून, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मनसेने निवेदन देऊन केली आहे.
आषाणे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडून गावाच्या नाल्याच्या बाजूने असणारा रस्ता आहे. सिमेंट काँक्रिटच्या असलेल्या या रस्त्यावरून डोंगरातून येणारे पावसाचे पाणी वाहत जाते. त्यात यावर्षी सलग पंधरा दिवस पावसाचे पाणी त्या रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे गावातील रस्त्याच्या खाली असलेला भराव वाहून जात आहे. वाहून गेलेल्या भरावामुळे हा रस्ता खचला आहे. परिणामी, संपूर्ण रस्ता वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्षासहलप्रेमी येत असतात. त्यामुळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत उमरोली ग्रामपंचायत आणि कर्जत पंचायत समिती यांच्याकडे मनसे उपविभाग अध्यक्ष मनोज ठाणगे, मनसे सैनिक अजित श्रीखंडे यांनी निवेदन दिले आहे.