। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील जिते ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे काम बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले होते. त्यातील बोर्ले ते जिते या रस्त्याच्या कामातील जिते गावातील 50 मीटर रस्त्याच्या भाग अद्यापही काँक्रीटीकरण करण्यापासून दूर आहे. त्यामुळे, उर्वरित रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
जिते गावाला जोडणार्या रस्त्याचे काम 2021ला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता. बोर्ले गावापासून जिते आणि पुढे कुंभे असे स्वरूप असलेल्या रस्त्याचे काम काही भाग डांबरी आणि काही भाग काँक्रीट अशा पद्यतीने केले जाणार होते. ग्रामीण विकास यंत्रणेकडून या रस्तात्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यादरम्यान, या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता रस्त्याचे काम रखडत असल्याने ग्रामीण विकास यंत्रणेकडून ठेकेदार बदलण्यात आले आणि रस्त्याचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण करण्यात आले होते. परंतु; जिते गावातील मुख्य चौकातील 50 मीटर रस्त्याचा भाग तीन वर्षाहून अधिक काळ होऊनदेखील अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बोर्ले आणि जिते गाव जोडणार्या रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून जिते गावातील काही मीटर लांबीचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल.
– राहुल चौरे, शाखा अभियंता,
ग्रामीण विकास यंत्रणा