। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध मंदिरांत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत दर्शन घेतले. दरम्यान, घारापुरी येथे दर्शनासाठी जाणार्या हजारो भाविकांनी उरण, मोरा, जेएनपीटी, न्हावा आणि गेटवे येथून जलप्रवास केला. मात्र, या जलप्रवासादरम्यान काही प्रवासी सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना निदर्शनास आले आहे. काही महिन्यांपूर्वीच घारापुरी येथे बोट दुर्घटनेत 15 जणांना जलसमाधी मिळाल्यानंतर प्रशासनाने जलप्रवासासाठी लाईफ जॅकेट अनिवार्य केले होते. यावेळी ओएनजीसी कंपनीने 1 हजार लाईफ जॅकेट उपलब्ध करून दिले होते. मोरा बंदरातून सुटणार्या 9 खासगी बोटींमध्येही त्याचा वापर होताना दिसत आहे. परंतु, काही प्रवासी लाईफ जॅकेट न घालताच जलप्रवास करत असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे, शासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.