ग्रामपंचायतीचा केरकचरा रस्त्यावर
| उरण | वार्ताहर |
स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राऊंड केल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. अशा कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.
तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला गेला असून, नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या मोठया प्रमाणात केरकचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत, शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करत असताना गावातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेचे तीनतेरा वाजवीत असून, जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. तसेच ग्रामस्वच्छतेसाठी आग्रही असणारे महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासनसुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. तरी, उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.
चरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड रस्त्यावरुन दररोज हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. या जागेवर आल्यावर नाक मुठीत धरावे लागत आहे. रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना हक्काचे डम्पिंग ग्राऊंड नाही. डम्पिंग ग्राऊंडसाठी उरण तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक घेण्याचा तसेच या अगोदर कुठल्या प्रकारचे डम्पिंग ग्राऊंडसाठी पत्रव्यवहार केला आहे यांची माहिती घेणार आहोत. हा जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्न असल्याने यावर लवकरच उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.
एस.पी. वाठारकर, गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती