तळ्यात विकास आघाडी करणार श्राद्ध आंदोलन
| तळा | वार्ताहर |
तळा येथे मोठा गाजावाजा करून आरोग्य विभागामार्फत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. परंतु, या ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तू शोभेचे बाहुले बनले असून, अधिकारी आणि कर्मचार्यांअभावी या रुग्णालयास टाळे लावण्यात आले आहे. शासनाचा करोडो रुपयांचा चुराडा झाला असून, परिसरातील रुग्णांची आरोग्याची हेळसांड होत आहे.
या रुग्णालयात अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांची पदे अजून भरण्यात आलेली नाहीत. महाआघाडीचे सरकार असताना राज्याच्या तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दि.28 जून 2022 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. परंतु, लोकार्पण केल्यानंतर हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले. मधल्या काळात महाआघाडीचे सरकार काही दिवसात गेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. या सरकारमध्ये श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अदिती तटकरे यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळाली, त्यामुळे येथील जनतेच्या रुग्णालयाच्या बाबतीत पुन्हा अशा पल्लवित झाल्या; परंतु एकमेव महिला मंत्र्यांकडूनदेखील भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी तळा तालुक्यातील विकास आघाडीतर्फे अनोखे श्राद्ध आंदोलन बुधवार, दि.4 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. हा अंधश्रद्धेचा भाग नसून, पारंपरिक पद्धतीने वर्षश्राद्ध करण्याचे योजले आहे, असे सांगण्यात आले.
रुग्णालयाच्या आत्म्यास शांती लाभून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठीचा प्रयत्न आहे, जेणेकरून तालुक्यातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील. हे श्राद्ध उद्घाटन करून बंद असलेले ग्रामीण रुग्णालय ते नजरेस पडेल इतक्या अंतरावर पार पडणार आहे.तळा शहरात सत्ताधार्यांची मनमानी असून, नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडरसाठी कामे केली जात असल्याचा आरोप होत असताना, या श्राद्ध आंदोलनाने सत्ताधारी आणि प्रशासन जागे होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.