| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, घटस्थापनेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नवरात्रोत्सवात देवीसमोर गरबा घटाची स्थापना करण्याची परंपरा असल्याने पनवेलमधील कुंभारवाड्यात गरबे तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. पनवेलच्या बंदर रोड परिसरातील कच्छी मोहल्ल्यातील कुंभारवाड्यात सध्या विविध आकारांचे आणि रंगांचे गरबे तयार करण्यात येत आहेत. कुंभारांकडून मातीला आकार देऊन त्यावर आकर्षक रंगकाम आणि नक्षीकाम केले जात आहे. त्यामुळे तयार झालेले रंगीबेरंगी गरबे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गरब्यांवर करण्यात येणारे बारीक नक्षीकाम, विविध रंगांची सजावट आणि आकर्षक डिझाइन यामुळे पारंपरिक गरब्यांना आधुनिक रूप मिळाले आहे. काही गरब्यांवर फुलांची नक्षी, तर काहींवर पारंपरिक कलाकुसर करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात घराघरांत घटस्थापना केली जाते. त्यामुळे घटस्थापनेसाठी गरबा खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची बाजारात लगबग सुरू झाली आहे. यंदाही पारंपरिक मातीच्या गरब्यांना नागरिकांकडून पसंती मिळत आहे. कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या गरब्यांची किंमत त्यांच्या आकारमानानुसार आणि केलेल्या नक्षीकामानुसार ठरवली जात आहे. साधारणपणे पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारचे गरबे उपलब्ध आहेत.
नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत गरब्यांच्या खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात दिवसभर गरबे तयार करण्याची लगबग सुरू असून, कारागिरांच्या हातांना वेग आला आहे. मातीला आकार देण्यापासून ते रंगकाम आणि नक्षीकाम करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कारागिरांची मेहनत दिसून येत आहे. त्यांच्या हातून साकारलेले हे पारंपरिक गरबे नवरात्रोत्सवाच्या सजावटीला खास आकर्षण देणार आहेत. देवीच्या आगमनाची चाहूल लागली असून, कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या रंगीबेरंगी गरब्यांमुळे पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह आणखी वाढला आहे.







