‌‘रानबाजिरे’च्या बॅकवॉटरची सुरक्षा रामभरोसे

सुरक्षारक्षक केवळ वाहनांना प्रवेश देणे अथवा नाकारण्यासाठी

| पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील पोलादपूर शहरालगतच्या रानबाजिरे गावात सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या बॅकवॉटरची सुरक्षा रामभरोसे असून पोलादपूर ते महाबळेश्वर वाई-सुरूर राज्यमार्ग क्र.74 लगत सुमारे अर्धा कि.मी. अंतराला 24 मिलीयन क्सुसेस बॅकवॉटर अगदी जवळून स्पर्श करीत असताना, या ठिकाणी केवळ वाहनांना प्रवेश देण्यासाठी अथवा नाकारण्यासाठी तसेच टिलींग वॉटरबेसकडे असे दोन सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. अलीकडेच हौशी सोशल मीडियाचे ड्रोन कॅमेरे धरण परिसरात मुक्तसंचार करीत शूटिंग करीत असल्याने बॅकवॉटरसह धरणाला असलेल्या संभाव्य धोक्याकडे महाड एमआयडीसीच्या अभियंत्यांकडून सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.

पोलादपूर शहरानजीक रानबाजिरे धरणामध्ये गेल्या महिन्यात 57.55 मीटर पाण्याच्या साठ्याची पातळी नोंदविण्यात आली असून, सुमारे 24 मिलीयन क्सुसेस बॅकवॉटर उपलब्ध आहे. या धरणाची बॅकवॉटरची बाजू पोलादपूर ते महाबळेश्वर वाई-सुरूर राज्यमार्ग क्र.74 लगत सुमारे अर्धा कि.मी. अंतराला स्पर्श करीत असून, या रस्त्यावरून हे रानबाजिरे धरण समोरच दिसून येत आहे. पूरस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या काळात रानबाजिरे धरण परिसरामध्ये हौशी सोशल मीडियाचे ड्रोन कॅमेरे धरण परिसरात मुक्तसंचार करीत शूटिंग करीत असल्याचे तसेच या कॅमेऱ्यांतील शूटिंगचे रिल्स व्हायरल झाल्याचे दिसून आले असल्याने या धरणाच्या असुरक्षिततेची एकप्रकारे रेकी झाल्याची शक्यता दिसून आली आहे.

काही वर्षांपूर्वी महाड एमआयडीसीने सुरक्षारक्षकांची मागणी केल्यानंतर रायगड सुरक्षा मंडळ पनवेल या मंडळाने पुरविलेले सुरक्षारक्षक सध्या एमआयडीसी कॉलनी, ऑॅफिस आणि धरणाजवळ तीन शिफ्टमध्ये सहा सुरक्षारक्षक म्हणजेच एका शिफ्टमध्ये दोनच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येत आहेत. यापैकी एक सुरक्षारक्षक टिलींग वॉटर बेसजवळील गेटजवळ, तर दुसरा प्रवेशद्वाराजवळ उभा असतो. प्रवेशद्वाराजवळच्या सुरक्षारक्षकाला वाहने अडविणे आणि प्रवेश देण्याचे काम करण्यासाठी चौकी बांधून देण्यात आली आहे. मात्र, या चौकीचे ठिकाण प्रवेशद्वाराच्या आतील भागात असल्याने प्रवेशद्वारापासून सुमारे 500 मीटर्स अंतरापर्यंत या धरणाच्या बॅकवॉटरचे सावित्री नदीचे पात्र पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र.74 ला समांतर आहे. मात्र, त्याकडे या प्रवेशद्वारावरील चौकीमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकाची नजरही पोहोचू शकत नाही.

पोलादपूरचे काही वर्षांपूर्वीचे पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी येथे गस्तीदरम्यान हजेरीपत्रक तयार केले होते. मात्र, रात्रीच्या वेळी येथे असलेली सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे पोलीस निरीक्षक कदम यांना संबंधितांना कळवावे लागले होते. काही वर्षांपूर्वी या धरण परिसरात 100 मीटर्स क्षेत्रामध्ये झालेल्या माती उत्खननाबद्दल पोलादपूर तहसील कार्यालयाने आकारलेली 5 लाख 16 हजार 416 रूपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजावूनही यावर संबंधितांकडून वरिष्ठ उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे अपील केल्याविनाच केवळ 30 हजार 100 रूपये कारवाईपोटी जमा करण्यात आली होती. गेल्यावर्षीदेखील या प्रकरणाला महसुली हवा देण्यात आली होती. या दोन घटना पाहता या धरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरजमिनीच्या क्षेत्रात पाऊस व धरणाचे पाणी मुरून धरणाला धोका निर्माण होऊ शकत असल्याने धरण मंजुरीवेळेच्या भौगोलिक परिस्थितीनुसार सध्याची भौगोलिक परिस्थिती आहे अथवा कसे याचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रानबाजिरे धरणाचे तत्कालीन एक्झीक्युटीव्ह इंजिनियर वुईके आणि डेप्युटी इंजिनियर वाळके यांनी यासंदर्भात तातडीने पाहणी करून येथील फेन्सिंग आणि कंपाऊंड वॉलची उंची वाढविण्याच्या आवश्यकतेला मान्यता दर्शविली होती. परंतु, लवकरच सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती देऊनही प्रत्यक्षात कोणती कार्यवाही आजमितीस करण्यात आली नसल्याने रानबाजिरे येथील एमआयडीसीच्या धरणाची सुरक्षा रामभरोसे ठेवण्यात एमआयडीसीच्या इंजिनियर्सना स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version