परंपरागत व्यवसाय वाचवण्यासाठी धडपड; मीठ उत्पादनात मोठी घट
| पेण | संतोष पाटील |
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका हा पूर्वी मिठाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. तालुक्यात तब्बल 27 मिठागरे कार्यरत होती. भातशेती आणि गणपती व्यवसायासोबत मीठ उद्योग हा स्थानिक अर्थकारणाचा कणा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राजाश्रय लाभलेल्या या उद्योगाची आज मोठी पडझड झाली आहे. मोजकेच शेतकरी आणि काही जिद्दी कारभारी अजूनही हा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी धडपड करीत आहेत.
पेण तालुक्यातील अंतोरा येथील बशीर कासम आणि त्यांचे बंधू, पेण देवआळीतील सदानंद देव आणि त्यांचे बंधू, तसेच सध्याच्या नगरपालिकेच्या ठिकाणी हजारेंची मिठ गिरणी अशी मोठी उत्पादन केंद्रे होती. भूंडा पुलाजवळील भागातही मीठ गिरण्या कार्यरत होत्या. या गिरण्यांमधून तयार होणारे मीठ मोठ्या प्रमाणावर धारावीपर्यंत पाठवले जात असे. गावोगावी बैलगाड्यांमधून मीठ विक्री करणारे विक्रेते हे त्या काळचे वैशिष्ट्य होते. “मीठवाले मीठ” अशी हाक ऐकून महिलांची लगबग उडायची आणि पावसाळ्यासाठी खड्या मिठाची साठवण केली जायची. मात्र, बदलत्या काळात हे चित्र पूर्णपणे बदलले. बैलगाड्या लुप्त झाल्या आणि मीठ विक्रीची पारंपरिक पद्धतही इतिहासजमा झाली. एकेकाळी दरवर्षी 30 ते 35 हजार टन उत्पादन करणारा हा उद्योग आज केवळ दीड ते दोन हजार टनांवर आला आहे.
पूर्वी उचेडे, कांदळेपाडा, मळेघर, पिंपळपाडा या भागातील अनेक पुरुष व महिलांना मिठागरांमध्ये रोजगार मिळत होता. कांदळे येथील अनंत पाटील आणि बाळाराम ठाकूर हे मुकादम म्हणून काम पाहात असत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 ते 35 तरुण कार्यरत होते. आज मात्र स्थानिक तरुण या व्यवसायाकडे वळत नसल्याने गुजरातमधून मजूर आणण्याची वेळ आली आहे. सध्या 27 मिठागरांपैकी केवळ चारच मिठागरे कार्यरत असून त्यात चिखली अगर, हीरा अगर आणि वाहना अगर यांचा समावेश आहे. येथे तयार होणारे मीठ पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि खोपोली येथे पाठवले जाते. वीटभट्टी, औद्योगिक वापर, बर्फनिर्मिती तसेच अर्थिंगसाठी या मिठाचा उपयोग केला जातो.
शहरीकरण, जमिनींची विक्री आणि बदललेली जीवनशैली यामुळे मीठ उद्योगाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी धनदांडग्यांनी कमी दरात मिठागरांची जमीन खरेदी केल्याने हा पारंपरिक व्यवसाय अधिकच कमी झाला आहे. तरीही काही शेतकरी हा वडिलोपार्जित व्यवसाय टिकवण्यासाठी तोटा सहन करत प्रयत्नशील आहेत.
एक नजर आकडेवारीवर
पूर्वी मिठागरे : 27
सध्या कार्यरत : 4
पूर्वीचे उत्पादन : 30-35 हजार टन/वर्ष
सध्याचे उत्पादन : 1,500 ते 2,000 टन/वर्ष
प्रमुख बाजारपेठ : पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खोपोली
मीठ म्हणजे शेतकऱ्याचे पांढरे सोने आहे. वडिलोपार्जित व्यवसाय बंद करायचा नाही म्हणून तोटा सहन करत मीठ उत्पादन सुरू ठेवले आहे. मात्र, मजुरांची कमतरता, अवकाळी पाऊस आणि वाढते खर्च यामुळे हा व्यवसाय टिकवणे कठीण होत चालले आहे.
कल्पेश पाटील,
मीठ उत्पादक, शिर्की
