मीठ निरीक्षकांचे दुर्लक्ष
| पेण | संतोष पाटील |
शिवकाळापासून पेण हे मीठ उत्पादन करण्याचे प्रमुख केंद्र. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील मिठाला संरक्षण दिलं होतं. परंतु, कालपरत्वे मीठ हा उद्योग आता संपुष्टात यायला लागलेला आहे. काही खारेपाट्यातील मंडळी आयडियाची कल्पना लावून मिठागरांच्या जागेवर आज मत्स्यशेती करत आहेत. शासनाकडून मिठागरे भाडेपट्ट्यावर उत्पादनासाठी घेत आहेत. मात्र, मीठ उत्पादन न घेता त्या जागेवर मोठमोठाली शेततळी तयार करून त्यामध्ये मत्स्यशेती करत आहेत.
बोरी गावचा रहिवासी असलेल्या कविता पांडुरंग म्हात्रे यांनी शासनाकडून शिंगणवट गट क्र. उपविभाग 25 चा एकूण क्षेत्र 6.51.00 हे आर (देवआगर) हा मीठ उत्पादन करण्यासाठी भाडेपट्ट्यावर वीस वर्षांसाठी 1,52,828 रूपयांना जागा घेतली. परंतु, त्या देवआगरात मीठ उत्पादनाच्या ऐवजी शेततळी खोदून त्याच्यात मत्स्यशेती करत आहेत. त्याचप्रमाणे मिठागरातून बाजूच्या शेतकर्यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता होता. परंतु, यांनी पूर्ण मिठागरांच्या जागेला तारेचे कुंपण घालून शेतकर्यांचा वहिवाटीचा रस्तादेखील बंद केलेला आहे. त्यामुळे शेजारील शेतकरी नाराज आहेत. ही सर्व बाब मीठ निरीक्षक पियुष कुमर यांना माहिती असूनदेखील त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे, असा शेतकर्यांचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कविता म्हात्रे यांनी या मिठागराच्या येथे मत्स्य साठवण्यासाठी शीतघर (कोल्ड स्टोरेज) देखील बांधला आहे. दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायत बोरीला कविता म्हात्रे यांनी कोल्ड स्टोरेजची नोंदणी होण्यासाठी अर्ज केला असून, त्यामध्ये त्यांनी मत्स्यव्यवसाय करण्याचे कबूल केलेले आहे. तर, 29 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायतीला केलेल्या अर्जानुसार मिठागरात काम करणार्या कामगारांना विश्रांती घेण्यासाठी पत्र्याची शेड बांधली असल्याचा अर्ज केलेला आहे. याचाच अर्थ, कविता म्हात्रे या शासनाची फसवणूक करत आहेत, हे सिद्ध होत आहे. एकंदरीत काय, तर मिठागराच्या नावाने मत्स्यशेती करून शासनाची फसवणूक कविता म्हात्रे आणि त्यांचे पती पांडुरंग म्हात्रे यांनी केली आहे, असे स्थानिक शेतकर्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मीठ निरीक्षकांची टाळाटाळ
‘कृषीवल’चे प्रतिनिधी गुरूवारी (दि.6) आणि सोमवारी (दि.10) मीठ निरीक्षक पियुष कुमार यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले असता दोन्ही दिवस ते भेटले नाहीत. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे मीठ निरीक्षकाचा अनागोंदी कारभारदेखील समोर येत आहे.
जमीन ही मिठागरासाठी भाडेपट्ट्यावर घेतली आहे. परंतु, त्याठिकाणी आम्ही मत्स्यशेती करत असल्याचे मान्य आहे. ग्रामपंचायत बोरीला कोल्ड स्टोरेजची नोंदणी होण्यासाठी अर्ज केला असून, त्यामध्ये त्यांनी मत्स्यव्यवसाय करण्याचे कबूल केलेले आहे.
पांडुरंग म्हात्रे