। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिन शनिवारी (दि.8) साजरा करण्यात आला. या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील चार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्यावतीने तैसिन छापेकर, राजश्री नाईक, सृष्टी पाटील व सारा पेरेकर या चार महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मैनुशेठवाडा येथील रहिवासी तैसिन छापेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या हिताचे काम केले आहे. त्यामध्ये त्यांनी आदिवासी विभागात वाडा वस्त्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, आहार, क्षमता वाढवणे, शिक्षणाची उमेद जागवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, बालविवाह, आरोग्य व आहार संबंधित जनजागृती केली आहे. रायगड जिल्हा परिषद व नेहरू युवा केंद्र यांच्या सहकार्याने अलिबागमधील सर्व समुद्रकिनारे तसेच पंचायत रुग्णालयांमध्ये महिनाभर प्लास्टिक संकलन मोहीम राबवली आहे. तसेच, नेहरू युवा केंद्र संघटन क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसदेमध्ये (विधान भवन, विधान परिषद) रायगड युवा खासदार म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे.
किहीम आदीवासीवाडीमधील राजश्री नाईक या तरुणीने रुरल अॅन्ड यंग फाऊंडेशन मार्फत तळागाळातील व गरजूंसाठी काम केले आहे. आदिवाडीवर शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मोफत रात्र अभ्यासिका वर्ग घेतले आहे. त्याचबरोबर आदिवासी कुटूंब सक्षमीकरण, जनजागृती करणे, विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचविणे, उच्च शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहीत करत त्यांना मदत करणे, अशी वेगवेगळी कामे सामाजिक बांधिलकीतून करून तळागळातील घटकाला उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे.
सृष्टी पाटील या तरुणीने एनसीसी एअर फोर्समधून शिक्षण घेतले आहे. 20 ते 23 डिसेंबर 2024 मध्ये सिलीगुडी दार्जिलींग येथे आयोजित नॅशनल पावरलिफ्टींग बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या क्रीडा प्रकारात 44 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यामध्ये इंडिया ज्युनिअर स्ट्राँग वुमेन म्हणून मानकरी ठरली आहे. त्यामुळे तिची जागतिक पातळीवर निवड करण्यात आली आहे. जोधपूर येथील आखिल भारतीय वाय सैनिक शिबिरात महाराष्ट्र संचालयाचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये सर्वात्कृष्ट संचालनालयाचा पुरस्कार मिळविला आहे. शंभर व दोनशे मीटर राज्यस्तरिय धावण्याच्या स्पर्धेत यश संपादन केले असून जिल्हा स्तरावर बुध्दीबळ स्पर्धेतदेखील यश मिळविला आहे. पोयनाड येथील सारा पेरेकर हीने विज्ञान प्रदर्शनात राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. चंदीगड येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात तीने उत्तम कामगिरी बजावली आहे.
या चार महिलांचा विशेष सत्कार सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आला. यावेळी कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत, महर्षि विनोद सिध्दाश्रम सेवा मंडळाच्या विश्वस्त अॅड. आदिती वैद्य, जि.प. माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पेंढाबे ग्रामपंचायतीचे सदस्य रुपेश पाटील, डॉ. सुषमा वाघ, संजीवनी जोगळेकर, माजी कृषी अधिकारी फड, उर्मिला वारळकर, डॉ. शुभदा कुडतलकर आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.