एसी लोकलला अच्छे दिन
। डोंबिवली । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणार्या लोकल महागड्या तिकिटांमुळे रिकाम्या जातात. प्रवाशांची या लोकलला गर्दी नसते. या लोकलमुळे नियमितच्या लोकलचे वेळापत्रक मागेपुढे झाले. अशी चौफेर चर्चा, टीका प्रवाशांकडून केली जाते. मात्र, तापमानाचा पारा 40 च्या वर गेल्यापासून उन्हाच्या काहिलीने, घामांच्या धारांनी हैराण झालेले प्रवासी थोडी खिशाला कात्री लावत, पण गारेगार वातानुकुलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी 8.59 ला कल्याणहून येणारी वातानुकुलित लोकल मोजकेच प्रवासी चढून सुरू व्हायची. उन्हाचा पारा वाढल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत कल्याणहून येणारी वातानुकुलित लोकल प्रवाशांनी गच्च भरलेली असते. कल्याणहून प्रवासी बसून, उभे राहून येतात. एवढी गर्दी या लोकलला वाढू लागली आहे, असे या लोकलने प्रवास करणार्या प्रवाशांनी सांगितले. यापूर्वी मोजकेच प्रवासी नियमित या लोकलने प्रवास करत होते. ही परिस्थिती वाढत्या तापमानामुळे बदलली आहे, असे प्रवासी सांगतात.
नियमितच्या लोकलने गर्दी, घुसमटीत प्रवास केला की घामाच्या धारांनी शरीर ओथंबून जाते. कपडेही खराब बोतात. कार्यालयात कामात लक्ष लागत नाही. उष्णता वाढल्यापासून वातानुकुलित लोकलने आम्ही मित्र प्रवास करत आहोत, असे प्रवाशांच्या एका गटाने सांगितले. या लोकलचा वाढत्या तिकीट दरामुळे नियमितचा प्रवास सामान्य प्रवाशाला परवडणारा नाही. पण उन्हाच्या चटक्यामुळे होणारी अस्वस्थता दूर करणे आणि आरोग्याचा विचार केला तर गारेगार लोकल उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच आरामदायी वाटते, असे केशव जोशी या प्रवाशाने सांगितले.