रामराज आरोग्य उपकेंद्राचा स्लॅब कोसळला

परिचारिका जखमी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील रामराज येथील आरोग्य उपकेंद्राचे स्लॅब कोसळले. त्या ठिकाणी काम असलेली परिचारिका जखमी झाली असून तिला अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.26) घडल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 54 आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्र आहेत. या संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम केले जाते. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका खासगी मालमत्तेला मोठ्या प्रमाणात बसला. रामराज येथील उपकेंद्रामध्ये उपचारासाठी अनेक रुग्ण येतात. डोंगरदर्‍यात राहणार्‍या रुग्णांची वर्दळ मोेठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी दुपारी उपकेंद्रात काम करीत असताना एका महिला परिचारिकेच्या अंगावर स्लॅब कोसळला. सुदैवाने मोठी हानी टळली. मात्र परिचारिका जखमी झाली असून तिला अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयातील स्लॅब कोसळल्याने कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उपकेंद्राची योग्य पध्दतीने दुरुस्ती केली जात नसल्याचा फटका तेथील कर्मचारी व रुग्णांना कायमच बसत आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.


रामराजमधील आरोग्य उपकेंद्रातील स्लॅब कोसळला. त्यामध्ये परिचारिका जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती बरी आहे.

– डॉ. मनीषा विखे,
जिल्हा आरोग्य अधिकारी

दुरुस्तीचा निधी पडून
रामराज येथील उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी सात लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वर्क ऑर्डरदेखील काढण्यात आली. मात्र काम वेळेवर केले नाही. त्यामुळे पावसाळ्यात स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. निधी असतानादेखील काम न केल्याचा फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे.
Exit mobile version