| पेण | प्रतिनिधी ।
पेण वनपरिक्षेत्रातील गागोदे परिमंडळाच्या अधर्णे नियतक्षेत्रातील वरवणे परिसरात पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत सुरू असलेली बेकायदा खैर वृक्षतोड वनविभागाच्या धडक कारवाईमुळे उघडकीस आली. बुधवारी (दि. 26) पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास वरवणे परिसरात खैर वृक्षांची बेकायदा तोड सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.
वन अधिकारी सपना सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गागोदे, वनरक्षक जावळी, धामणी उत्तर, कामार्ली तसेच वाहनचालक यांनी वरवणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंतिम संपादित गट क्रमांक 68-अ परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी काही व्यक्ती खैर जातीचे लाकूड वाहनात भरत असल्याचे वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. पथकाची चाहूल लागताच संशयितांनी जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
वनविभागाने घटनास्थळावरून महिंद्रा झायलो वाहन ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैर जातीचे चार नग, एकूण 0.101 घनमीटर लाकूड आढळून आले. लाकूड आणि वाहन चौकशीकामी जप्त करण्यात आले असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरासारख्या मौल्यवान वृक्षांची रात्रीच्या अंधारात कत्तल करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. जंगलातील वृक्षतोडीमागे नेमके कोण आहेत, याचा तपास सुरू असून पसार संशयितांना लवकरच ताब्यात घेतले जाणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पहाटेच्या अंधारात खैराची कत्तल
