| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड येथील तवसाळकर लॉजसमोरील रस्त्यावर रखडलेल्या मोरीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाने पाच दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत संबंधित ठेकेदाराने मोरीचे काम पुन्हा हाती घेतले आहे.
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी या मोरीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र मोरीची एक बाजू तयार केल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम अपूर्ण ठेवून काम बंद करण्यात आले होते. त्यातच सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
या समस्येची दखल घेत पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले. मोरीचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत, 15 ऑगस्टपूर्वी काम सुरू न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या निवेदनाची दखल घेत ठेकेदाराने अखेर मोरीच्या कामाला सुरुवात केली. काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर, उपाध्यक्ष देवेंद्र सतविडकर आणि शैलेश वारेकर यांचे आभार मानले आहेत. मोरीचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होऊन परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रखडलेल्या मोरीच्या कामाला अखेर सुरुवात
