| मुंबई | प्रतिनिधी |
शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. मंगळवारी बाजाराची घसरगुंडी झाली होती. बुधवारी बाजार सुरू होताच या घसरणीत आणखी वाढ झाली आणि सलग दुसर्या दिवशी बाजार कोसळला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बाजाराने थोडी तेजी दाखवली होती. मात्र, आता बाजार कोसळला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने त्याची महत्त्वाची सपोर्ट लेव्हल ब्रेक केल्याने या घसरणीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाल्यावर त्यात थेडी तेजी दिसत होती. मात्र दुसर्या टप्प्यात अनेक मोठ्या शेअरचे दर कोसळल्याने बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. बुधवारी बाजारात आणखी मोठी घसरण झाली आहे. बँकनिफ्टीमध्ये 1170 अंकांपर्यत घसरण झाली होती. तर बँक निफ्टी बंद होताना 1069 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.