। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीतील विद्यार्थ्याने दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरला. या घटनेत अल्पवयीन मुलगा (वय 15) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुलगा मांजरी परिसरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकत आहे.
शाळेतील वार्षिक समारंभावरून घटनेतील दोन्ही मुलांचा शाब्दिक वाद झाला होता. मंगळवारी (दि. 19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मुलगा वर्गात बसला होता. त्याचवेळी त्याच वर्गातील दुसऱ्या 14 वर्षीय मुलाने पाठीमागून येऊन त्याच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यात तो गंभीर जखमी झाला. शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी जखमीला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, दुसऱ्या दिवशी जखमी मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.