| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सोमवारी मोठ्या घसरणीसह झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्स 1450 अंकांनी कोसळला. तर निफ्टीचा निर्देशांक 15,800 च्या खाली आला. परिणामी गुंतवणुकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 1981 पासून ग्राहक किंमत निर्देशांकात सर्वात मोठी वाढ झाली आहे. सध्या सेन्सेक्समध्ये 1450 अंकांची घसरण असून तो 52,850 पातळीवर स्थिरावला. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सुमारे 400 अंकांनी घसरून 15,800 च्या पातळीवर सोमवारी सकाळी आला. निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आयटी निर्देशांकमध्ये सुमारे 3 टक्क्यांनी, वाहन निर्देशांकमध्ये सुमारे 2 टक्के आणि रियल्टी निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बजाज ट्विन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंडिया बँक, कोटक बँक, एचडीएफसी कंपन्यांचा समावेश आहे.