इंडो एनर्जीमुळे उपासमारीची वेळ
| पाली | वार्ताहर |
रोहा येथील इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रा.लि. (सानेगाव जेट्टी) कंपनीत 13 ते 14 वर्षे काम करीत असलेल्या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रा.लि. कंपनीने कोव्हिड काळात कंपनीत कामगार कपात केली असून, काम करीत असलेल्या तब्बल 57 कामगारांना घरी बसविले आहे. त्यापैकी अर्ध्या कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर रुजू करुन काहींना मात्र तसेच वार्यावर सोडले आहे.
पुन्हा कामावर घेतील या प्रतिक्षेत असलेल्या कामगारांच्या घरच्या चुली विझण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याबाबत ठाणे येथील लेबर कोर्टानेदेखील कामगारांच्या बाजूने न्याय दिला असला तरीसुद्धा कंपनी प्रशासन कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यास तयार नाही. यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त कामगार हे तरुण युवक आहेत, त्यामुळे या तरुणांचे भविष्य अंधारमयच झाल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. यादरम्यान सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रुपाने आशेचा किरण कामगारांच्या दृष्टीस पडला व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, सामाजिक विभागाचे माजी मंत्री अविनाश महातेकर यांच्या माध्यमातून आरपीआय रायगड जिल्हा युवक सचिव अॅड.सुशील गायकवाड, सुधागड तालुका युवक अध्यक्ष निशांत पवार, विवेक रोकडे, तुषार पगारे यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रविवार, दि.29 रोजी मुंबई बांद्रा येथील पक्ष कार्यालयात भेट निवेदन सादर केले.
कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी व तरुण पिढीचे भविष्य अंधकारमय होऊ नये हेतूने मंत्री आठवले यांनी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर दिपककुमार सैगल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली व त्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात व कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याच्या सूचना केल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व बंदर मंत्री संजय बनसोड यांनादेखील कामगारांबाबत कंपनीने हिताचे निर्णय घेण्यासाठी तात्काळ कार्यवाही याकरिता पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.







