कोरोनामुळे एकल झालेल्या भगिनींना अर्थसहाय्य
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना ने काही महिलांना वैधव्य आले. त्यांचे पती या महामारी रोगाचे शिकार ठरले. त्यामुळे संबंधित भगिनींचा आधार हरपला आहे. त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा महिलांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळावा या उद्देशाने महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये संबंधितांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना सुद्धा मदत केली जाणार आहे. याबाबतही महिला व बालकल्याण समितीने हिरवा कंदील दिला आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती पदाचा पदभार घेतल्यानंतर मोनिका प्रकाश महानवर यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरणाच्या अनुषंगाने विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी मनपा क्षेत्रात महिला विषयक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने पाऊल टाकले. महासभेने त्यांच्या या प्रस्तावाचे कौतुक करून सर्वानुमते मंजुरी दिली. या धोरणाची काही प्रमाणात अंमलबजावणी सुध्दा सुरू झाली आहे.
या बैठकीस महिला बालकल्याण समितीच्या सदस्या नगरसेविका तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये एकल महिलांना आर्थिक करण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्याचबरोबर करणामुळे अनाथ झालेल्या मुलांनासुद्धा आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला.