कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली भावना
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय संघासाठी निर्णायक ठरू शकेल. या पाठिंब्यामुळे आम्हाला 12 वर्षांपासूनचा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची प्रेरणा मिळेल, असे वक्तव्य भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने केले.
विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. नुकताच विश्वचषकाचा करंडक वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे नेण्यात आला. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहितने करंडक हाती घेऊन मायदेशात होणाऱ्या विश्वचषकाबाबत आपली मते मांडली. “मी विश्वचषकाचा करंडक इतक्या जवळून यापूर्वी पाहिलेला नाही. 2011च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात माझा समावेश नव्हता. हा करंडक खूपच सुंदर आहे. काही महिन्यांनंतर मला पुन्हा हा विश्वचषक उंचावण्याची संधी मिळेल अशी आशा आहे,” असे रोहितने ‘आयसीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विश्वचषकाचे सामने विविध 10 स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. सर्व सामन्यांना, विशेषत: भारताच्या सामन्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. “प्रत्येक शहर, प्रत्येक स्टेडियमवर आम्हाला चाहत्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा लाभेल याची मला खात्री आहे. विश्वचषकाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहात असतात. भारतात 12 वर्षांच्या कालावधीनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 2016 मध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे भारताने यजमानपद भूषवले होते, पण आता आम्ही एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करणार आहोत. देशातील प्रत्येक जण या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहे. आमच्यासाठी चाहत्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल,” असे रोहित म्हणाला.
विश्वचषक जिंकण्यासाठी आम्हाला संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल, असेही रोहितने नमूद केले. “2015 आणि 2019च्या एकदिवसीय विश्वचषकात आम्ही उपांत्य फेरीचा टप्पा गाठला होता. अंतिम फेरीत पोहोचण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला, पण आम्हाला त्यात यश मिळाले नाही. आता घरच्या मैदानावर निकाल वेगळा लागेल, अशी मला आशा आहे. तुम्ही विश्वचषक एक किंवा दोन दिवसांत जिंकू शकत नाही. तुम्हाला महिना-दीड महिना सातत्यपूर्ण आणि सर्वोत्तम कामगिरी करावी लागते,” असे रोहितने सांगितले.
2011चा विश्वचषक अविस्मरणीय
भारताने 2011मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. त्या भारतीय संघात रोहितला स्थान मिळाले नव्हते. तरीही तो विश्वचषक आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे रोहित म्हणाला. “2003च्या विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत चांगला खेळला होता. 2007मध्ये भारतीय संघाला बाद फेरीही गाठता आली नव्हती. मात्र, 2011चा विश्वचषक अविस्मरणीय ठरला. मी प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू घरी बसून पाहिला होता. त्यावेळी मला दोन प्रकारच्या भावना होत्या. मी या स्पर्धेत खेळत नसल्याचे दु:ख होते. मी विश्वचषकाचे सामने पाहणार नाही असे ठरवले होते. मात्र, मला राहावले नाही. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपासून अप्रतिम कामगिरी केल्याचे मला आजही आठवते,” असे रोहित सांगितले.