फणसाड अभयारण्यात मुबलक पाणवठे
| मुरुड | सुधीर नाझरे |
मुरुड तालुक्यात तापमानात वाढ होत असतानाही फणसाड अभयारण्यात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांची मुबलक उपलब्धता असल्याने वन्यजीवांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे जंगलातील जलस्रोत टिकून राहिले असून, वन विभाग सतर्क आहे.
तालुक्यात यंदा गतवर्षीपेक्षा तापमानात वाढ झाली असून, सध्या पारा 32 ते 33 अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक उष्णतेने त्रस्त झाले असले तरी फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी पाण्याची कमतरता जाणवत नाही. नबाबकालीन संरक्षित शिकार क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या अभयारण्यात घनदाट जंगल आणि समाधानकारक पर्जन्यमानामुळे जलस्रोत टिकून आहेत. सुमारे 54 चौ.कि.मी. परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात फणसाड व विहूर ही दोन धरणे असून, 27 नैसर्गिक पाणवठ्यांपैकी तब्बल 22 पाणवठे सध्या पाण्याने परिपूर्ण आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन विभागाने कृत्रिम पाणवठेही तयार केले आहेत. ज्या ठिकाणी सौरऊर्जा उपलब्ध नाही, तेथे वाहनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांनी दिली.
मुंबईपासून सुमारे 154 कि.मी. अंतरावर असलेले फणसाड अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे 718 प्रकारची वनसंपदा आढळते. यामध्ये 154 पक्षी प्रजाती, 50 फुलपाखरांच्या प्रजाती, 24 सस्तन प्राणी, 20 सरिसृप आणि 13 उभयचर प्रजातींचा समावेश आहे.
अलीकडे रानगवे व रानकुत्र्यांचेही दर्शन होत असल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या परिसरात सरासरी 2800 ते 2900 मि.मी. पावसाची नोंद होते. साग, निलगिरी, किंजळ, जांभूळ, कुडा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन यांसारखी विविध वृक्षसंपदा येथे आढळते. पर्यटकांसाठी अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आले असून, फणसाड गाण, सावर तलाव आणि सुपेगाव देवराई हे प्रमुख आकर्षण आहेत. ‘गाण’ म्हणजे पाण्याचा साठा असून, येथे 27 गाणी आहेत. विशेषतः चिखल गाणीवर दर 24 तासांत वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याचे निरीक्षण आहे. पुण्याचा माळ, चाकाचा माळ आणि दांडा या ठिकाणी उंच निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच पर्यटकांसाठी बैलगाडी सफरीचीही व्यवस्था स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
फणसाड अभयारण्याची वैशिष्ट्ये
क्षेत्रफळ : 54 चौ.कि.मी.
नैसर्गिक पाणवठे : 27 (त्यापैकी 22 भरलेले)
धरणे : फणसाड व विहूर
वनसंपदा : 718 प्रकार
पक्षी : 154 प्रजाती
फुलपाखरे : 50 प्रजाती
सस्तन प्राणी : 24
सरिसृप : 20
उभयचर : 13
सरासरी पर्जन्यमान : 2800 ते 2900 मि.मी.
अभयारण्यात सध्या पाण्याची कमतरता नाही. नैसर्गिक पाणवठ्यांबरोबरच कृत्रिम पाण्याची सोय केली आहे. ज्या ठिकाणी सुविधा नाहीत, तेथे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. आमचे कर्मचारी सतत या कामात कार्यरत आहेत.
नितीन ढगे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड
