कृत्रिम बशी तलाव भागवत आहेत तहान
| आगरदांडा | गणेश चोडणेकर |
मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील सुमारे 54 कि.मी. परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला आहे. नवाब सरकाराने हे अभयारण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरक्षित केलेले आहे. येथे विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. या अभयारण्यात पाण्याचे 27 हून अधिक नैसर्गिक स्त्रोत असतानासुद्धा कृत्रिम असे 25 बशी व वन तलाव तयार करण्यात आले आहेत.
सध्या मुरुड तालुक्याचे तापमान 35 डिग्री सेल्सियन सऊन, पक्षी व वन्यजीव, प्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली आहे. बशी तलाव व वन तलावांमध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी बोअरवेलसुद्धा मारण्यात आलेल्या असून, याद्वारे तलवात पाणी टाकले जात आहे. तसेच अन्य ठिकाणांहूनसुद्धा गाडीच्या सहाय्याने पाणी आणले जाऊन प्राण्यांची तहान भागविण्याचे उत्तम काम फणसाड अभयारण्य विभागाकडून केले जात आहे.
या अभयारण्यात 19 प्रकारचे वन्यप्राणी यामध्ये बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरु, पिसोरी, ससा, काळमांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, रान कुत्रा, गवा, गिधाड आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच या अभयारण्यात 718 प्रकारचे वृक्ष, 19 प्रकारचे सस्तन प्राणी, 27 प्रकारचे साप, 190 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 130 प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्ल्यू मॉरमॉन, मॅप आदी फुलपाखरे दिसून येतात. याबरोबर नाग, फुरसे, घोणस, मण्यार, असे विषारी व हरणटोळ, अजगरसारखे बिनविषारी साप येथे आढळत असतात. या प्राण्यांना पूर्वीपासून पिण्यासाठी जंगल भागात नैसर्गिक पाण्याची 27 जलस्त्रोत आहेत. परंतु, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याचे तलावात पाणी कमी होते. पर्यायी म्हणून ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी कृत्रिम बशी तलाव बांधून सदर बशी तलावात आठ दिवसांतून एकदा टेंपोच्या साह्याने हजोरो लीटर पाणी टाकून वन्यप्राणी, पक्षी यांची तहान भागविण्याचे काम फणसाड अभयारण्यातर्फे करण्यात येत आहे.
फणसाड अभयारण्यामध्ये असणार्या नैसर्गिक केतकीची गाण, सावरट तलाव, आंबेगाणं, चिखलगाण, धरणाची गाण, बांध तलाव, असे विविध 27 पाण्याचे पाणवठे स्वच्छ करून गाळ काढून खोलगट करण्याचं काम केल्याने पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे वन्यप्राणी, पक्षी यांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. या उपक्रमामुळे वनप्राण्यांच्या तृष्णा तृप्तींची सोय केली गेल्याने प्राणी-पक्षीप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
फेब्रुवारी महिन्यापासून निसर्ग जलस्त्रोतातील पाणी कमी होत असल्याने वन्य प्राण्यांची गैरसोय होऊ नये त्याकरिता फणसाड अभयारण्यामार्फत कृत्रिम पाणवठे दुरुस्त करून त्यामध्ये हजारो लीटर पाणी टेम्पोद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. याकरिता नांदगाव वनपाल आदेश पोकळ, वनरक्षक अरुण पाटील, संतोष पिंगळा, केरबा खांडेकर, सुनील जाधव हे सातत्याने धडपड करीत आहेत.
नितीन ढगे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयरण्य
कृत्रिम पाणवठे निर्माण केल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. फणसाड अरण्यातील वनपाल चांगली मेहनत घेत आहे. ही मेहनत चांगला पाऊस पडेपर्यंत घ्यावी. जेणेकरुन कोणाताही वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीत जाणार नाही.
संदीप घरत,
पक्षीप्रेमी