। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील पोसरे-सडेवाडीसह मूळगाव-देऊळवाडी येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या नव्या नळपाणी योजनेमुळे दोन्ही वाड्या टंचाईमुक्त झाल्या आहेत. येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रयत्नांना यश आल्याने ग्रामस्थ कमालीचे सुखावले आहेत. वर्षानुवर्षे धावणार्या पाण्याच्या टँकरला यंदा ब्रेक लागला असून टंचाई आराखड्यातूनही दोन गाव-वाड्या कमी झाल्या आहेत.
पोसरे-सडेवाडी येथील जुनी नळपाणी योजना अतिवृष्टीत जमीनदोस्त झाली होती. गेल्या 4 वर्षांपासून येथील पाणीप्रश्न ऐरणीवरच आला होता. फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचे उपलब्ध जलस्रोत आटत होते. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी दरवर्षी भटकंतीच सुरू होती. जलजीवन मिशन योजनेंतर्गत येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नवी नळपाणी योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला. या योजनेचे कामही पूर्ण झाले असून ग्रामस्थांच्या घरापर्यंत नळाचे पाणी पोहचले आहे. पाणीटंचाई कायमचीच संपुष्टात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
या पाठोपाठच मूळगाव-देऊळवाडी येथील ग्रामस्थांनाही पाण्यासाठी दरवर्षी टाहो फोडावा लागत होता. येथील पाणीटंचाई संपुष्टात आणून ग्रामस्थांची वणवण थांबवण्यासाठी नवी नळपाणी योजना राबवण्यात आली. येथेही मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. येत्या काही दिवसात आणखी गाव-वाड्या टंचाईमुक्त होतील, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शैलेश बुटाला यांनी सांगितले.