। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतातील प्रतिष्ठित इंडियन ऑइल अल्ट्रा सायकलिंग शर्यतीची दुसरी आवृत्ती 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तब्बल 3,758 किमीचे अंतर असलेली ही शर्यत श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे सुरू होऊन कन्याकुमारीत पूर्ण होणार आहे. ही शर्यत 12 राज्यांमधून प्रवास करताना विविध लँडस्केप, हवामान आणि भूप्रदेशाचा सामना करत पुढे जाणार आहे. या शर्यतीला वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनकडून (डब्ल्यूयूसीए) मान्यता मिळाली असून रेस क्रॉस अमेरिकेचा (आरआरएएम) क्वालिफायर इव्हेंट (आरक्यू) म्हणून काम करत आहे.
बर्फाच्छादित हिमालयाच्या मध्यभागी सुरू होणारा अल्ट्रा सायकलिंगचा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग 44, भारतातील सर्वात लांब महामार्ग, उत्तरेकडील पर्वतांपासून तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भूमीपर्यंत, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या महत्त्वाच्या भारतीय राज्यांमधून जाणार आहे. हिमालयाच्या थंडीपासून ते दख्खनच्या पठाराच्या उष्णतेपर्यंत आणि दक्षिणेकडील दमट किनारपट्टीच्या प्रदेशात रायडर्सना हवामानातील बदलाशी जुळवून घेत आगेकूच करावी लागणार आहे. या रेसमधील सहभागींना यमुना, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णा यांसारख्या प्रमुख नद्या ओलांडताना हिमालय, आरवली, विंध्य आणि सातपुडासह महत्त्वाच्या पर्वतराजींमधून 18,201 मीटर उंचीवरून सायकल रेसचा अनोखा अनुभव अनुभवता येणार आहे. आव्हानात्मक भूप्रदेश आणि हवामानातील संक्रमणांसह ही शर्यत एक-दोन आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक रायडर्सच्या मानसिक आणि शारीरिक कणखरतेचा कस लागणार आहे.